कर्नाटक : झेडपीच्या शिफारशीनंतरच कामे | पुढारी

कर्नाटक : झेडपीच्या शिफारशीनंतरच कामे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायतीच्या तत्कालीन अध्यक्षांनी हिंडलगा गावात विकासकामांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी पंचायत राज विभागाकडे केल्यानंतरच हिंडलग्यात विकासकामे राबवली गेली, असे आता स्पष्ट होत आहे. तसेच तत्कालीन झेडपी अध्यक्षांच्या पत्राला पंचायत राज विभागाकडून अनुमोदन मिळाल्याचेही सकृतदर्शनी दिसते. मात्र, पत्र खरे असले तरी पंचायत विभागाकडून मिळालेले अनुमोदन बनावट असल्याचा संशय जिल्हा पंचायत सीईओंनी व्यक्‍त केला आहे. त्यामुळे कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.

संतोष पाटील यांनी कोणतीही मंजुरी न घेता कामे केल्याचे आतापर्यंत मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांच्यासह अन्य नेतेदेखील सांगत होते. परंतु, गुरुवारी या प्रकरणाला अचानक कलाटणी मिळाली. तत्कालीन जिल्हा पंचायत अध्यक्षा श्रीमती आशा ऐहोळे यांनी 15 फेब्रुवारी 2021 रोजी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज खात्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील सर्व रस्ते खराब झाले असून, गटारींचीही सोय नाही. येथील ग्रामस्थांच्या सततच्या मागणीमुळे व दबावामुळे येथील रस्ते व गटारी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सोबत जोडलेल्या विकासकामांना अनुमोदन देऊन विशेष अनुदान मंजूर करावे.

ऐहोळे यांच्या सहीनिशी असलेल्या या पत्रासोबत हिंडलग्यातील 108 कामांची यादीही आहे. यादीच्या खालील बाजूस हिरव्या पेनने लिहिलेले दोन शेरे आहेत. यापैकी ऐहोळे यांच्या लेटरहेडवरील पत्रावर एक ईएन नंबर आहे, त्याखाली कन्नडमध्ये ‘आदेश देण्यात येत आहे’, असा उल्लेख आहे, तर 108 कामांच्या यादीवर ‘अनुमोदनासाठी आदेश देण्यात येत आहे’, असा उल्लेख करून सही केलेली आहे. याचा अर्थ हिंडलग्यात 108 कामे राबविण्यात यावीत, असे पंचायत राज विभागाने सूचित केले होते, असा होतो. हे पत्र 15 फेब्रुवारी 2021 रोजी बंगळूरला पाठवले होते. त्या पत्राला 17 फेब्रुवारी 2021 रोजी पंचायत राज विभागाकडून अनुमोदन (मंजुरी) मिळाले आहे.

पत्रावर बंगळूरचा शिक्‍का, सही

तत्कालीन जि.पं. अध्यक्षांच्या लेटरहेडवर हिरव्या पेनने केलेल्या सहीच्या बाजूलाच गोल शिक्का मारला आहे. ग्रामविकास व पंचायत राज खाते, बंगळूर असा शिक्क्याचा मजकूर आहे.

दोन्ही सह्या, शिक्क्याबाबत संशय

तत्कालीन जि. पं. अध्यक्षांनी जरी पत्र लिहिले असले, तरी त्यावर सही, शिक्का मारणारे अधिकारी कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कारण, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार ही सही बंगळूर येथील अधिकार्‍यांचीही नाही व बेळगाव येथील कोणीही अशी सही केलेली नाही. मग, खर्‍या पत्राची पोच घेऊन त्यावर बनावट सही, शिक्का मारला आहे का? या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना जिल्हा पंचायतीची सीईओ दर्शन एच. व्ही म्हणाले, बंगळूरहून सचिवांकडून विकासकामांना मंजुरी मिळाली असेल तर तसे स्वतंत्र पत्र येते. माझ्या अधिकारात असेल, तर मी तसे स्वतंत्र पत्र देतो. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या लेटरहेडवर व 108 कामाच्या यादीवर बंगळूर किंवा बेळगावातून कोणी अनुमोदन दिलेले आहे, असे वाटत नाही. सह्या बनावट असण्याचे आणखी एक कारण म्हणजे एकदा सरकारी कार्यालयातून पोच मिळाल्यानंतर त्या पत्रावर नंतर कोणी काहीही लिहू शकतो. त्यामुळे नेमका प्रकार काय, हे पोलिस तपासातच स्पष्ट होईल. शिवाय, या कामाबाबत मला आजतागायत ग्रा. पं. अध्यक्ष, सदस्य अथवा कंत्राटदारदेखील भेटलेले नाहीत. 15 व्या वित्त आयोगात एका ग्रामपंचायतीला 35 ते 40 लाखांचा निधी मिळतो. जर ग्रामपंचायत मोठी असेल तर 50 ते 60 लाख अनुदान मिळते. परंतु, चार कोटींचे अनुदान एका ग्रामपंचायतीला मिळण्यात अनेक अडचणी असतात.

कुठल्याही ग्रामपंचायतीचे लोक जसे माझ्याकडे आल्यानंतर पत्र लिहिते, तसेच हिंडलगा ग्रामपंचायतीचेही सदस्य भेटल्यानंतर मी हिंडलगा गावच्या विकासाबाबतचे पत्र पंचायत राज विभागाकडे पाठवले होते. आधी त्यांनी फक्त पत्र दिले, नंतर कामाची यादी दिली; पण माझ्याकडून पत्र गेल्यानंतर ती कामे मंजूर झाल्याचा आदेश प्राप्त झालेला नाही. तशी प्रत आपल्याकडे तरी आलेली नाही. – आशा ऐहोळे, तत्कालीन जि. पं. अध्यक्षा.

जि. पं. अध्यक्षांना निवेदन दिल्यानंतर ते पुढे पाठविणे किंवा स्वतःच्या लेटरहेडवर शिफारस पत्र देणे हे साहजिकच आहे. 15 फेब्रुवारी रोजी त्यांनी तसेच पत्र दिले आहे. पहिल्या व शेवटच्या पानावर अनुमोदन दिल्याचा उल्लेख आहे. परंतु, या दोन्ही ठिकाणच्या सह्यांबाबत संशय आहे. कारण, अध्यक्ष या नात्याने जरी जि. पं. अध्यक्षांनी पत्र दिले तरी त्याला अनुमोदन देण्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे पोलिस या प्रकाराचीही चौकशी करतील. – दर्शन एच. व्ही. सीईओ, जिल्हा पंचायत

Back to top button