कर्नाटक : रस्ताकामांना पैसा कंत्राटदारांचा, सावकारांचा अन् मटका बुकींचाही! | पुढारी

कर्नाटक : रस्ताकामांना पैसा कंत्राटदारांचा, सावकारांचा अन् मटका बुकींचाही!

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण विकासमंत्री ईश्‍वरप्पा रस्ताकामाचे बिल देत नाहीत, म्हणून कंत्राटदार संतोष पाटील अस्वस्थ होतेच. परंतु, ज्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेऊन पाटील यांनी रस्ताकाम केले ते गुंतवणूकदारदेखील आता अडचणीत आले आहेत. एकूण चार कोटींच्या विकासकामांमध्ये सुमारे 12 उपकंत्राटदारांनी आपले पैसे गुंतवले आहेत. त्याबरोबरच रस्ताकामासाठी पैसे पुरविणार्‍यांमध्ये एक सावकार, एक बिल्डिंग कंत्राटदारासह दोघे मटका बुकीही आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पैकी एका गुंतवणूकदाराने तर संतोष पाटील यांच्या घरासह त्याची मालमत्ता लिहून घेतली होती, अशी माहिती मिळाली आहे.

कंत्राटदार संतोष पाटील यांची आत्महत्या, 40 टक्के कमिशन आणि यातून मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी दिलेला राजीनामा यामुळे हे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. काँग्रेसने हा राजकीय मुद्दा बनवत संतोष पाटीलला न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेतली. परंतु, काँग्रेस नेतेदेखील ‘न रोवा कुंजरोवा’ अशी भूमिका घेत आहेत.याप्रकरणी आता पोलिसांनीदेखील वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला आहे. संतोष यांच्या पत्नीने आपल्या पतीने दागिने विकून रस्ताकामात पैसा घातला, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. परंतु, याशिवायदेखील काहींनी यामध्ये पैसे गुंतवल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शहर व हिंडलगा परिसरातील दोघे मटका बुकी व एका बिल्डिंग कंत्राटदाराने 60 टक्क्यांहून अधिक रक्कम गुंतवल्याचे समोर आले आहे. याशिवाय एका निवृत्त अधिकार्‍याने आपल्या भाच्याला काम मिळावे, यासाठी 25 लाखांची गुंतवणूक केल्याचे समजते.
सावकार अडचणीत?

रस्ताकामासाठी विजयनगर परिसरातील एका सावकारानेदेखील सुमारे 50 लाखांची वेळोवेळी मदत केली आहे. संतोष यांना ही मदत करताना त्याने बाँड लिहून घेण्यासह कोरे धनादेशदेखील घेतले आहेत. परंतु, ज्याने कर्ज घेतले होते ती व्यक्‍तीच न राहिल्याने सावकारासमोर ही रक्कम वसूल कोणाकडून व कशी करायची, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ही कागदपत्रे घेऊन समोर आलो, तर यामध्ये आपणही सामील होऊ, या भीतीने हा सावकार सध्या तरी शांतच आहे.

घर लिहून घेण्यापर्यंत मजल

एका गुंतवणूकदाराने तर आपली रक्कम मिळायला हवी, यासाठी संतोष यांच्याकडे सातत्याने तगादा लावला होता. परंतु, वरूनच रक्कम मिळत नसल्याने ते देणार कोठून, अशी स्थिती असल्यामुळे संबंधिताने संतोष पाटील यांच्या घराची कागदपत्रे घेऊन घर आपल्या नावे लिहून घेण्यापर्यंत मजल गेल्याचे समोर येत
आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button