कर्नाटक : मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्‍कामोर्तब; २० जणांना मंत्रिपद? - पुढारी

कर्नाटक : मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्‍कामोर्तब; २० जणांना मंत्रिपद?

नवी दिल्‍ली, बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 20 जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी यादी जाहीर केली जाणार असून, बुधवारी शपथविधी होणार आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही याद्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील होते. सुमारे दोन तास त्यांच्यात चर्चा सुरू होती.

प्रत्येक नाव निश्‍चित करताना आमदाराची पार्श्‍वभूमी, पक्षासाठी दिलेले योगदान, पारदर्शक व्यवहार, स्वच्छ राजकारणी अशा विविध निकषांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतरच नावांवर शिक्‍कामोर्तब झाले.

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्‍ली दौरा केला होता; पण त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा एका फेरीतील चर्चा करुन मंत्रिमंडळ विस्तार करण्याची सूचना श्रेष्ठींनी बोम्मईंना दिली होती. त्यानुसार सोमवारी ते दिल्‍लीला रवाना झाले.

उपमुख्यमंत्रिपदावर दीर्घ चर्चा

गतवेळेप्रमाणेच यावेळीही उपमुख्यमंत्रिपद अस्तित्वात आणण्याविषयी दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्रिपद नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील या विचाराने हे पद यंदा नको असल्याचे मत व्यक्‍त झाले.

पण, आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून एकगठ्ठा मते मिळवण्याबाबत हिशोब घालण्यात आला. दलित, लिंगायत, वक्‍कलिग आणि अनुसूचित जमाती अशी चार उपमुख्यमंत्रिपदे अस्तित्वात आणण्याबाबत सकारात्मक दृष्टीने विचार करण्यात आला.

इच्छुकांचे दिल्‍लीत ठाण

मंत्रिपद मिळवण्यासाठी सुमारे डझनभर इच्छुक आमदार नवी दिल्‍लीत ठाण मांडून आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांन आपापल्या गॉडफादरमार्फत मुख्यमंत्री आणि श्रेष्ठींवर मंत्रिपदासाठी ठाण मांडून होते.

माजी मंत्री लक्ष्मण सवदी, सी. सी. पाटील, राजूगौडा नाईक, आ. सतीश रेड्डी, अरविंद बेल्‍लद यांच्यासह सुमारे डझनभर आमदार दिल्‍लीतील नेत्यांच्या भेटी घेत होते. याद्वारे त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर दबावाचा प्रयत्न होत होता.

भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष आणि केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामार्फत बेल्‍लद मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत होते.

याआधी सवदी यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. यामुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला होता. पंचमसाली समाजाला यावेळी दोन ते तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. माजी मंत्री मुरुगेश निराणी शिवाय शंकर पटेल मुनेन्‍नकोप यांना मंत्रिपद निश्‍चित असल्याचे सांगितले जात होते.

येडिंच्या निवासावर इच्छुकांची गर्दी

मुख्यमंत्री बोम्मई दिल्‍लीला जाताच अनेक इच्छुकांनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत श्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दिवसभर आमदारांची ये-जा असल्याने येडियुराप्पांचे कावेरी निवास म्हणजे राजकीय केंद्रबिंदू बनला होता.

आ. एम. पी. कुमारस्वामी यांनी भेट घेऊन मंत्रिपदासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. नेहरु ओलेकार यांच्या समर्थकांनी निवासासमोर मंत्रिपदाच्या मागणीसाठी निदर्शने केली.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिल्‍लीला जाण्याआधी येडियुराप्पा यांची भेट घेतली. त्यांच्यात मंत्रिमंडळाविषयी चर्चा झाली. येडियुराप्पांनी आपल्या समर्थक आमदारांची नावे बोम्मईंकडे दिल्याचे समजते. त्यांच्या नावांचा श्रेष्ठींनी गांभीर्याने विचार केला.

Back to top button