निपाणी : सरड्या तस्करी प्रकरणाचा अखेर उलगडा | पुढारी

निपाणी : सरड्या तस्करी प्रकरणाचा अखेर उलगडा

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : सरड्या तस्करी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील एकाची बेळगावमधील हिंडलगा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

वाघनखी किंवा (हत्था जोडी) वनस्पतीचे मूळ घरात ठेवल्यास लक्ष्मी नांदते या अंधश्रद्धेपोटी जंगल प्रदेशातील सरडे यांची हत्या करून त्याचे तुकडे करून विक्री करणाऱ्या कोल्हापूरातील एकाला जिल्हा वन विभागाच्या पोलीस पथकाने शनिवारी अटक केली.

यावेळी पथकाने संशयित याच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार संशयिताचे नाव सांगता येत नसल्याची माहिती पथकाच्या निरीक्षक रोहिणी पाटील यांनी दिली.

यावेळी संशयिताकडून दहा हजार रुपये किंमतीचे २५ तुकडे व दुचाकी असा एकूण ५० हजाराचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

अलीकडच्या काळात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा वन्यजीवांवर उठली आहे. यातीलच एक अंधश्रद्धा सरड्याच्या जिवावर उठली, हत्था जोडी वनस्पतीच्या मुळासारखे सरडे दिसत असल्याने त्यांची हत्या करून या सरड्याच्या तुकड्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याच्या संशयावरून, जिल्हा वनविभागाच्या पोलिस पथकाने शुक्रवारी निपाणीत दिवसभर थांबून धागे-दोरे मिळवित निपाणीतील एकाच्या मदतीने कोल्हापुरातील अशा प्रकारची वनस्पती विकणाऱ्या एका संशयिताला वाहनांसह ताब्यात घेतले होते.

विशेष करून गरिबीतून मुक्ती हवी असल्यास आपल्या घरी हत्था जोडी या दुर्मिळ वनस्पतीच्या मुळ्याचे तुकडे भासवून जंगल प्रदेशातील सरडे या प्राण्याची हत्या होत असल्याची बाब निदर्शनास आली.

त्यानुसार सबंधित झाडाच्या मुळाचे तुकडे करून त्याची तस्करी काहीजण करतात, अशी माहिती पथकाला निपाणीतील एका किराणा दुकानदाराकरवी मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूरातील एकाकडुन याची काही दिवसापूर्वी विक्री होत असल्याची माहिती मिळाली.मात्र अशा प्रकारची वस्तू निपाणीत पथकाला मिळाली नव्हती.

मात्र पथकाने कोल्हापुरातील एकाला त्याच्या वाहनासह ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयिताने संबंधित वनस्पती भासवून सरड्या या प्राण्याची हत्या करून त्याचे तुकडे करून विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगण्याचे दिसून आले.

त्यानुसार संशयितांवर वन्यजीव व कायद्याने गुन्हा दाखल करून त्याला शनिवारी निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने संशयितांची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली.

याबाबत आपण स्वतः फिर्याद दिली असल्याची माहिती निरीक्षक रोहिणी पाटील यांनी दिली. या कारवाईत पथकाचे हवालदार के. डी. हिरेमठ, मारुती नाईक, एम. आर. अरविंची यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने पथकाचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे केवळ दैनिक पुढारीने शनिवारच्या अंकात निपाणी परिसरातून सरड्यांची तस्करी अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

त्यामुळे या प्रकरणाचा खराखुरा उलगडा झाला.शनिवारी अनेकांनी दैनिक ‘पुढारी’ने या प्रकरणाचा उलगडा केल्याने अभिनंदन केले.

Back to top button