कोगनोळी : कर्नाटक एन्ट्रीसाठी RT-PCR निगेटिव्ह आवश्यक | पुढारी

कोगनोळी : कर्नाटक एन्ट्रीसाठी RT-PCR निगेटिव्ह आवश्यक

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : कोगनोळी : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने कर्नाटक सरकारने शनिवारी दुपारी पुन्हा नव्याने मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे.

इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश देऊ नये असा आदेश काढला आहे.

त्यांची कडक अंमलबजावणी शनिवारी दुपारपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमा तपासणी नाका कोगनोळी येथे झाली आहे. दुपारी चारपासून संध्याकाळी सहापर्यंत कर्नाटकात येणारी सुमारे शेकडो वाहने प्रशासनाने माघारी धाडली आहेत. त्यामुळे कर्नाटकातील प्रवेश पुन्हा अडचणीचा ठरला आहे.

राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूची जारी केल्यानंतर तातडीने तहसिलदार डॉ. मोहन भस्मे, निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी तातडीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सीमा तपासणी नाका येथे जाऊन त्याची अंमलबजावणी चालवली.

शिवाय येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन मार्गदर्शक सूचीची माहिती देऊन त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात महापुरामुळे सीमा तपासणी नाक्यावरील कामकाजात काही काळ खंड पडला होता. यादरम्यान इतर राज्यातून कर्नाटकात आणि अनेकांनी बिनधास्त प्रवेश केला आहे.त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या कर्नाटकात वाढत चालली आहे.

ही बाब गांभीर्याने सरकारच्या लक्षात आल्याने राज्य सरकारने जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासनला नवीन मार्गदर्शक सूचीनुसार राज्याच्या सीमा बंद कराव्यात तसेच कडक निर्बंध लावून rt-pcr प्रमाणपत्र पाहिजे. शिवाय राज्यात कोणत्याही नागरिकांना प्रवेश देऊ नये असे सांगितले आहे.

त्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून सुरू झाली आहे. कोणीही इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करताना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोना बाबत सर्व त्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी केले आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button