बेळगाव : खायचा आहे आंबा, तरी अजून थांबा! | पुढारी

बेळगाव : खायचा आहे आंबा, तरी अजून थांबा!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : यंदा ‘फळांचा राजा’ बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. राज्यातील आंबा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होत असे. यंदा हवामान बदलामुळे विलंब झाला आहे. काही प्रमाणात कोकणातून आंबा दाखल झाला आहे. मात्र, राज्यातील आंब्याची आवक नसल्याने आंबाप्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरवर्षी बाजारपेठेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी आंबा दाखल होतोे. मात्र, हवामानात झालेल्या बदलाच्या परिणामामुळे आंबा पीक उशिरा दाखल होणार आहे. किरकोळ प्रमाणात आंबा दाखल झाला आहे.

राज्यामध्ये बेळगाव, कोलार, रामनगर, बंगळूर ग्रामीण, चिकबळ्ळापूर, धारवाडसह विविध जिल्ह्यांतील 2 लाख हेक्टर क्षेत्रात आंब्याचे लागवड क्षेत्र आहे. यंदा 1.50 हेक्टर क्षेत्रात आंबा उत्पादन घेतले जात आहे. यंदा झाडे मोहोरताना वातावरणात झालेल्या बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बदामी, तोतापुरी, मलिका, रसपुरी, नीलम, हापूस, कलमी अशा विविध जातीच्या आंब्यांचे 12 ते 15 लाख टन उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा यात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 ते 6 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाऊक बाजारात अपेक्षित प्रमाणात आंब्याची आवक होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापार्‍यांतून सांगण्यात येत आहे.

उत्तम प्रकारे उत्पादन झाल्यास प्रति हेक्टर 8 ते 10 टन उत्पादन होते. मात्र, अवकाळी पाऊस, धुके यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी 1.5 लाख हेक्टर क्षेत्रात 12 ते 15 लाख टन आंब्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, हवामानाच्या बदलामुळे यावर परिणाम झाला आहे. बाजारपेठेतही अपेक्षित प्रमाणात आंबा उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
– डॉ. एच. बी. हित्तलमनी, आंबा तज्ज्ञ बागायत खात्याचे निवृत संचालक.

यावर्षी आंब्याच्या झाडांना मोहोर विलंबाने सुटला आहे. त्यामुळे बाजारपेठेत राज्यातील आंबा दाखल होणे लांबले आहे.
-महांतेश मुरगोड, बागायत खात्याचे उपसंचालक .

Back to top button