बेळगाव : चिकोडी तालुक्यात पाकिस्तानी नोट मिळाल्याने खळबळ | पुढारी

बेळगाव : चिकोडी तालुक्यात पाकिस्तानी नोट मिळाल्याने खळबळ

चिकोडी (जि. बेळगाव) ; काशिनाथ सुळकुडे : पाकिस्तान देशाची नोट (चलन) मिळाल्याने करोशी गावात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिस तपास करीत आहेत. चिकोडी तालुक्यातील करोशी गाव हे १२ ते १४ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. येथील धार्मिक स्थळांना देशातील विविध भागातून लोक येत असतात. करोशी गावात चक्क पाकिस्तानी चलन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान एका युवकाला करोशी बस स्थानकावर रस्त्यावर पडलेली एक नोट मिळाली. सदर चलन पाकिस्तानी देशाचे असून त्यावर पाकिस्तान देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र आहे. त्यावर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे इंग्रजीत व इतर मजकूर उर्दू भाषेत छापण्यात आला आहे. तर सदर नोट ही १० रूपयाची आहे. हे पाहून पाकिस्तान देशाची नोट असल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले. यामुळे सदर तरुण आज चिकोडी पोलिस स्थानक गाठून पीएसआय यमनाप्पा मांग यांच्याकडे सोपवून याविषयी माहिती दिली.

ही बाब गांभीर्याने घेऊन चिकोडी पोलिस व गुप्तचर खात्याने तपास सुरू केला आहे. करोशी गावात पाकिस्तानहून कुणी आले आहेत का? नोट कुठून आली? कुणी आणले? या मागे मोठे जाळे आहे का याविषयी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button