कर्नाटक : बेळगावात होणार किडवाई कॅन्सर रूग्णालय | पुढारी

कर्नाटक : बेळगावात होणार किडवाई कॅन्सर रूग्णालय

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
कॅन्सर रुग्णांच्या सोयीसाठी राज्य सरकारने बेळगावात किडवाई कॅन्सर प्रादेशिक संस्थेला मंजुरी दिली आहे. त्यासाठी वडगाव येथील तालुका आरोग्य केंद्राच्या बाजूला चार एकर चार गुंठ्यांत संस्था उभारण्यात येणार असून पुढील महिन्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती किडवाई कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. रामचंद्र यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 1) किडवाई कॅन्सर प्रादेशिक संस्थेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. रामचंद्र म्हणाले, दोन दिवसांपासून आम्ही कॅन्सर रूग्णालय आणि शिक्षण संस्थेसाठी जागा शोधत होतो. अखेर वडगाव येथील जागा निवडण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या संस्थेसाठी 50 कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. बेळगावात होणारी ही संस्था लोकांच्या सोयीची ठरणार आहे.

आमदार अभय पाटील यांनी किडवाई कॅन्सर रूग्णालयामुळे सात जिल्ह्यांतील सुमारे दीड कोटी लोकांना लाभ मिळू शकतो. याशिवाय महाराष्ट्र आणि गोव्यातील रूग्णांसाठीही सोयीचे ठरणार आहे, असे सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी आदी उपस्थित होते.

Back to top button