बेळगाव : खासगीकरण, महागाईविरोधात एल्गार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
वाढती महागाई, बेरोजगारी आणि खासगीकरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दहा ते बारा संघटनांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अंगणवाडी सेविकांची संख्या लक्षणीय होती.

केंद्र सरकारने सर्व क्षेत्राचे खासगीकरण सुरू केले आहे. यापुढे कोणत्याही क्षेत्राचे खासगीकरण करण्यात येऊ नये, केंद्र आणि राज्य शासन नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. ते बंद करण्यात यावे, नवे कामगार कायदे रद्द करण्यात यावे, करपात्र नसलेल्या कुटुंबांना 7 हजार 500 रुपये महिना अनुदान देण्यात यावे, कृषीमालाला हमी भाव देण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, जीवनाश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना 21 हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे, त्यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, रोहयोमध्ये गुंतवणूक वाढवण्यात यावी, वैद्यकीय प्रतिनिधींना कामाचे तास आणि वेतन आयोग लागू करण्यात यावा, कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवण्यात यावी, जय किसान या खासगी मार्केटचा परवाना रद्द करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मागण्यांसाठी सोमवारपासून संप पुकारण्यात आला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रत्येक संघटनेचे स्वतंत्रपणे निवेदन स्वीकारले. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून करण्यात आली. मोर्चा चन्नम्मा चौक, कोर्टरोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलनामध्ये आयटकचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नागेश सातेरी, सीटूचे कार्याध्यक्ष जे. एम. जैनूखान, सी. एम. खराडे, सी. एस. बिदनाळ, दोडाप्पा पुजारी, बी. व्ही. कुलकर्णी, बँक कर्मचारी संघटनेचे विनोद कुमार, अंगणवाडी सेविका संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मंदा नेवगी, यल्‍लूबाई सुगेहळ्ळी, विद्यार्थी संघटने नेते राजू घाणगे, पोस्टचे कर्मचारी, शेतकरी संघटनेचे नेते सहभागी झाले होते.

हेही वाचलत का ?

Exit mobile version