बेळगाव : मनपा जागा विकणार; 6 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांनी केला सादर | पुढारी

बेळगाव : मनपा जागा विकणार; 6 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांनी केला सादर

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या 37 खुल्या जागांचा ई-लिलाव करून, व्यापारी आस्थापनांचे भाडे वाढवून येत्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात महसूल जमा करण्यात येणार आहे. जागा विकून सुमारे 25 कोटी रुपये जमतील, असे सांगतानाच महापालिका प्रशासक तथा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी 6 लाख 31 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. महापालिका सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशासक हिरेमठ म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना सामावून घेऊन सर्वंकष अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. 447 कोटी 65 लाखांचा अर्थसंकल्प आहे. आर्थिक वर्षात 447 कोटी 58 लाख 91 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. पहिल्यांदाच उद्यमबाग परिसरातील व्यापारीवर्गाच्या मूलभूत सुविधांसाठी तरतूद केली आहे. तेथील रस्ते, गटारी आणि पाणी व्यवस्थेसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या सुक्या आणि ओल्या कचर्‍याच्या वर्गीकरणाची टक्केवारी 67 टक्के इतकी आहे. ती शंभर टक्के करण्याचा आमचा प्रयत्न असणार असून त्यासाठी शहरात सर्वांना कचरा पेट्या देण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले, महिलांसाठी बाजारपेठेत पिंक टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.विश्रांतीगृहांचीही निर्मिती करण्यात येणार आहे. कांदा मार्केट, शहापूर दाणे गल्‍ली आणि कोतवाल गल्‍ली बाजारपेठेत महिलांसाठी विश्रांतीगृहांची उभारणी करण्यात येईल. त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बचतगट, स्वयंरोजगारासाठी 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिकेच्या खुल्या जागांत कचरा टाकण्यात येत असतो. याशिवाय अतिक्रमणाच्या तक्रारीही येत आहेत. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी लवकरच पालिकेच्या माळमारुती व इतर ठिकाणी असलेल्या 37 जागांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. करवाढ लादली जाणार नाही. त्यामुळे व्यापारी संकुलांतील व्यापार्‍यांना वाढीव भाडे द्यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी, प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी उपस्थित होत्या.

पुन्हा नव्याने जुन्याच घोषणा

अर्थसंकल्पात पथदीप, कचरा, उद्यान विकास, स्मशानभूमी विकास आदींबाबत जुन्याच घोषणा नव्याने करण्यात आल्या. त्यामुळे पत्रकारांनी प्रशासक एम. जी. हिरेमठ आणि आयुक्‍तडॉ. रुद्रेश घाळी यांना याबाबत जाब विचारला. त्यावर अनेक प्रश्‍नांवर माहिती करून घेऊ, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

महापालिकेच्या सेवांचे विकेंद्रीकरण

महापालिकेच्या चारही विभागात मालमत्ता कर भरणा, जन्म? मृत्यू उतारे, खाते बदल, व्यापार परवाना आणि नूतनीकरण अशा सर्व सेवा देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्यासाठी परिसरातील लोकांच्या सोयीसाठी विभागीय कार्यालयांतच नागरी सेवा देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्‍त डॉ. रुद्रेश घाळी यांनी दिली. लोकांच्या सोयीसाठी शहरातून मिनी बससेवा सुरू करण्याबाबतही परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

हेही वाचलत का ?

Back to top button