बेळगाव आणि गोव्याचे एकमेकांशी ऋणानुबंध : गोविंद गावडे | पुढारी

बेळगाव आणि गोव्याचे एकमेकांशी ऋणानुबंध : गोविंद गावडे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच एका प्रादेशिक समुहाच्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला ते हजर राहिले. तो कार्यक्रम म्हणजे ‘दैनिक पुढारी’चा कोल्हापूर येथील वर्धापन दिन सोहळा. मोदीजींचे समर्थक व गोवा राज्याचे माजी सहकार व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी ‘पुढारी ऑनलाईन’शी संवाद साधला. बेळगाव आणि गोवा या दोन्ही ठिकाणचे ऋणानुबंध कसे आहेत, याविषयी गोविंद गावडे यांनी संवाद साधला.

माजी मंत्री गावडे म्हणाले, गोवा आणि बेळगाव यांच्यात खूप मोठे सांस्कृतिक संबंध आहेत. गोव्यातील नाट्यकलाकार बेळगावमध्ये येऊन अनेक नाटके करून गेले आहेत. त्याचबरोबर बेळगाव येथील कितीतरी कलाकारांच्या कलांचा आदर करून गोवा येथेही नाटकांचे कार्यक्रम आम्ही घडवून आणले आहेत. त्यामुळे केवळ व्यापार म्हणूनच नाही तर कला या क्षेत्रात ही बेळगाव आणि गोव्याचे मोठे ऋणानुबंध आहेत. गोवेकरांची फक्त बेळगावला फिरायला नव्हे तर लग्नकार्यासाठी लागणारी सर्व घडवत असो वा खरेदीसाठी भांडीदेखील बेळगावलाच मोठ्या प्रमाणात पसंती आहे. यासाठी बेळगावकरांना गोव्यातील गोवेकरांसाठी खूप महत्त्वाचे शहर आहे. आज विविध रोजगार, व्यापार तसेच व्यावहारिक औद्योगिक क्षेत्रातही बेळगाव आणि गोव्याचे मोठे ऋणानुबंध आहेत.

नुकत्याच एका राष्ट्रीय सर्वेक्षणात गोवा हे पर्यटनामध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आगामी काळात येथील पर्यटन व्यवस्था तसेच पर्यटन विकास अधिकाधिक चांगली करण्यासाठी सरकार आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका काय राहील?

-भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात गोवा एक पर्यटन स्थळ म्हणून पाहिले जाते. गोव्याची निसर्गसंपदा, वेगवेगळे धार्मिक स्थळे निसर्गरम्य वातावरण यामुळे जागतिक पर्यटकांची संख्या दरवर्षी मोठी आहे व त्यांचे स्वागतच आहे. नवा गोवा सर्वांगसुंदर नटलेला गोवा मला पुढे आणायचा आहे, यासाठी सातत्याने प्रयत्न आहेत.

मनोहर पर्रीकर, भाजप आणि गोवा हे एक वेगळेच समीकरण होते. पण पर्रीकर यांच्या निधनानंतर पर्रीकरांचा गोवा ही ओळख पुढील काळातही अशीच राहील का?

-माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा गोवा ही ओळख कायमच राहणार आहे. पर्रीकर हे माझे गुरू आहेत. त्यांच्या हाताखालीच माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा आम्हाला तयार करायचा आहे. राज्याला तरुण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लाभले आहेत. गोल्डन गोवासाठी आमची टीम आणि येणारे आगामी सरकार ही नक्की प्रयत्न करेल.

तुम्ही जितके राजकारणी आहात, त्याही पुढे तुम्ही नाट्य कलाकार आहात. बेळगावमध्ये तुम्ही अनेक नाटके केल्याचे समजते. तर कोणत्या सालमध्ये तुम्ही कोणती नाटके केली सादर केली आहेत?

-इथे ओशाळला मृत्यू हे नाटक आम्ही काही वर्षांपूर्वी बेळगाव मध्ये सादर केला होते. समर्थ सामर्थ्याचा या नाटकांमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. कॉलेजमध्ये असतानाही बेळगाव येथे नाटक बघण्यासाठी यायचो. कोल्हापूरमध्ये आम्ही दोन, दोन नाटके सादर केली आहेत.

गोवा राज्य पर्यटनातही तसेच विकासकामातूनही आघाडीवर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे?

-राज्याच्या विकासासाठी मोदीजींसारख्या व्यक्तीकडे देशाच्या नेतृत्वाची गरज आहे. मी पर्रीकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी, गोवा राज्य पर्यटनदृष्ट्या विकासात आघाडीवर राहील. यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे आम्ही विकासाबाबत नेहमी आग्रही आहोत. आंतरराष्ट्रीय पर्यटनामध्ये गोवा राज्याला पुढे नेण्याची धमक फक्त मोदीजी यांच्याकडेच आहे.

Back to top button