कोरोनाचा फटका; कर्नाटकातील १,२५८ लघुउद्योग बंद, १ लाख १८ हजार कामगारांनी गमावली नोकरी | पुढारी

कोरोनाचा फटका; कर्नाटकातील १,२५८ लघुउद्योग बंद, १ लाख १८ हजार कामगारांनी गमावली नोकरी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला. राज्यात कोरोनामुळे 1 हजार 258 लहान- मोठे लघुउद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या 1 लाख 18 हजार 273 कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. कोरोना महामारी काळात जे लहान उद्योग बंद झाले ते पुन्हा उभारलेच नाहीत. या ठिकाणी काम करणारे कामगारदेखील पर्याय म्हणून अन्य क्षेत्रात रोजीरोटीसाठी झगडत आहेत. राज्यात कोरोनामुळे 17 मोठ्या कंपन्यांनादेखील टाळे लागले आहे. 192 गुंतवणूकदरांनीदेखील बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

राज्यात 1,258 लहानमोठे उद्योगधंदे बंद झाले आहेत. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणार्‍या उद्योगांची संख्या 192 च्या घरात होती. 14,863 कर्मचारी अप्रत्यक्ष लघुउद्योगावर अवलंबून होते. तीन वर्षांच्या कालावधीत, 49,946 पुरुष आणि 33,244 महिलांनी नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत.

राज्यात 2018-19 पासून 1,166 लघुद्योजकांना चालना देण्यात आली असल्याची माहिती कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली होती. राज्यात 17 मोठे उद्योग बंद झाले आहेत. कच्च्या मालाचा अभाव, अनुभवी मनुष्यबळाची कमतरता, आर्थिक गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने बंगळूर, बागलकोट, गदग, कारवार, कोलार, चित्रदुर्ग जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योग बंद झाले आहेत. चित्रदुर्ग जिल्ह्यात 47,258 कोटी रुपयांचे सर्वाधिक भांडवल 2020-21 वर्षी गुंतवण्यात आले होते.

बंद पडलेले उद्योग व बेरोजगार संख्या

वर्ष       बंद पडलेले लघुउद्योग    बेरोजगार
2019         504                          36605
2020         562                          31722
2021         192                         49946
एकूण        1,258                     1,18 273

हेही वाचलत का ? 

Back to top button