कोल्हापूर : रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलणार; हेरिटेज लूक कायम ठेवून होणार सुशोभीकरण

कोल्हापूर : रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलणार; हेरिटेज लूक कायम ठेवून होणार सुशोभीकरण
Published on
Updated on

कोल्हापूर; सतीश सरीकर :  तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात आता दोन-चार तलाव शिल्लक आहेत. त्यापैकी रंकाळा तलाव म्हणजे कोल्हापूरचा पर्यटनद़ृष्ट्या श्वास म्हणूनच ओळखला जातो. कोल्हापूरकरांनी गेली 139 वर्षे रंकाळा जीवापाड जतन केला आहे. महापालिकेचा रंकाळा सुशोभीकरणासाठी 15 कोटींचा आराखडा मंजूर झाला असून 9 कोटी 84 लाख निधीही वर्ग झाला आहे. लवकरच सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. तलावाचा हेरिटेज लूक कायम ठेवून रंकाळ्याचे सौंदर्य आणखी खुलविले जाणार आहे.

मुंबईतील क्वीन्स नेकलेसच्या धर्तीवर रंकाळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. रंकाळ्याला रोषणाईने कोल्हापुरी साज रूपात सजविण्यात येणार आहे. चार आकर्षक प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. त्याला शाहूकालीन दगडी कमानीचाही लूक दिला जाणार आहे. शालिनी पॅलेसजवळ, तांबट कमान, जलसंपदा विभागाची जागा, पतौडी खण या ठिकाणी प्रवेशद्वार असतील. त्याबरोबरच शाहू स्मृती उद्यानाच्या अपूर्ण राहिलेल्या कमानीचे कामही पूर्ण केले जाणार आहे. या प्रवेशद्वाराच्या बाजूला दगडी भिंती बांधल्या जाणार आहेत. हेरिटेज लूक असलेल्या कमानी साकारण्यात येणार आहेत.

संपूर्ण रंकाळा फुटपाथ आणि पाथ-वेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. सुमारे दोन ते तीन मीटरपर्यंत पाथ-वे असणार आहेत. सभोवताली फूट लाईट बसविली जाणार आहे. पाथ-वेवर मर्दानी खेळांची शिल्पे साकारण्यात येतील. यात कुस्तीपासून मल्लखांबसह इतर मर्दानी खेळांचा समावेश असेल. रंकाळा टॉवर ते तांबट कमान यादरम्याच्या भिंतीवरील काही दगड निखळले आहेत. डोम पडले आहेत. त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी इराणी खण ते तांबट कमान या रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी पार्किंगसाठी नियोजन केले जाणार आहे. शाहू स्मृती उद्यान आणि रंकाळा परिसरात वॉटर एटीएम बसविण्यात येणार आहेत. रंकाळ्याभोवती सीसीटीव्ही असणार आहेत.

रंकाळा सुशोभीकरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आले आहे. कॉन्ट्रॅक्टरने दगड व इतर साहित्य आणले आहे. दगड घडविण्याचे काम सुरू आहे. लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होईल. रंकाळाप्रेमींच्या सूचनांचा विचार करून रंकाळ्याचे हेरिटेज अस्तित्व कायम राखून सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिली.

सुशोभीकरणाची कामे अशी…

कोल्हापुरी साजसारखी रोषणाई
1,70,19,435
चार प्रवेशद्वार, आकर्षक कमान
1,26,13,374
पदपथ उद्यान विकसित करणे
1,24,88,940

रंकाळा जोडण्यासाठी पाथ-वे
2,31,45,555
निखळलेले दगड, डोम, इतर दुरुस्ती
82,96,981
शिल्पे व इतर
70,46,364
पार्किंग इराणी खण
69,25,967
दोन वॉटर एटीएम शेडसोबत
10,99,545
महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह
97,62,080

तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता त्यांना रंकाळा सुशोभीकरण आराखड्याची माहिती दिली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावेळी एका तासात रंकाळ्यासाठी 9 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर करून तो महापालिकेकडे वर्ग केला. रंकाळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही. रंकाळा संवर्धनासाठी महापालिकेने केलेला आराखडा मंजूर करून घेऊ.
राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news