पुढारी वृत्तसेवा
येत्या ९ जानेवारीपासून विमेन्स प्रीमियर लीगच्या (WPL) नवीन हंगामाचा थरार रंगणार आहे.
या स्पर्धेने आतापर्यंत अनेक ऐतिहासिक आणि स्फोटक खेळी पाहिल्या आहेत, मात्र एक गोष्ट आजही चाहत्यांना चकित करते, ती म्हणजे WPL च्या इतिहासात अद्याप एकाही फलंदाजाला शतकी टप्पा गाठता आलेला नाही.
शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचूनही हुकलेल्या आणि प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या काही 'टॉप' खेळींचा घेतलेला हा आढावा.
WPL च्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम संयुक्तपणे जॉर्जिया वोल आणि सोफी डिव्हाइन यांच्या नावावर आहे. दोघींनीही ९९ धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे, डिव्हाइनने केवळ ३६ चेंडूत ९९ धावा कुटून गुजरातच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली होती. तर जॉर्जिया वोलने ५६ चेंडूत ही कामगिरी केली होती.
दुसऱ्या स्थानी अलिसा हिली आणि बेथ मूनी आहेत. हिलीने आरसीबी विरुद्ध १८ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ चेंडूत नाबाद ९६ धावा केल्या. तर मूनीने ५९ चेंडूत तितक्याच (९६*) धावा करत गुजरातला मजबूत स्थिती मिळवून दिली होती.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुजरात विरुद्ध ४८ चेंडूत ९५ धावांची वादळी खेळी केली होती. १९७.९१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत तिने मुंबईला १९१ धावांचे कठीण लक्ष्य गाठून दिले होते.
दिल्ली कॅपिटल्सची मेग लॅनिंग या यादीत ९२ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. मार्च २०२५ मध्ये तिने ५७ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली होती.