World's Expensive Egg : जगातील सर्वात महागडे अंडे 273 कोटींचे..!

पुढारी वृत्तसेवा

एका अंड्याची किंमत किती असू शकते? 7 रुपये, 10 रुपये, किंवा जास्तीत जास्त 25 रुपये.

पण एक असे अंडेही आहे, ज्याची किंमत 30.2 दशलक्ष (अंदाजे 273 कोटी रुपये) आहे.

हो, तुम्ही बरोबर वाचले आहे. इतक्या पैशात तुम्ही 100 हून अधिक हेलिकॉप्टर सहज खरेदी करू शकता.

नुकतेच या अंड्याची लिलावात विक्री झाल्यानंतर एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे.

‌‘हिवाळी अंडे असे त्याचे नाव असून हे प्रसिद्ध रशियन ज्वेलर्स फॅबर्गे यांनी तयार केले होते. ते त्यांच्या कलात्मकतेचे एक अद्वितीय उदाहरण आहे.

बर्फाच्या वितळणाऱ्या ब्लॉकसारखे दिसणारे हे अंडे क्रिस्टलपासून बनवलेले आहे. त्यावर अंदाजे 4,500 लहान हिरे जडवलेले आहेत.

शिवाय अंड्याच्या आत फुलांनी भरलेली एक टोपली ठेवली आहे. एकंदरीत या क्रिस्टल फॅबर्गे अंड्याची कारागिरी इतकी उत्कृष्ट आहे की, ती पाहणाऱ्यांना मोहित करते.

या अंड्याचा इतिहास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. हे अंडे रशियाचे झार निकोलस द्वितीय यांनी त्यांची आई, महाराणी मारिया फेडोरोव्हना यांना 1913 मध्ये ईस्टरला भेट म्हणून दिले होते.