पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्यात भांडी घासणे किंवा कपडे धुणे यांसारखी पाण्याची कामे करायला खूप भीती वाटते, कारण थंडीत पाणी बर्फासारखे गार असते.
पाण्यात हात टाकताच अंगावर काटा येतोच, शिवाय बोटे सुन्न होऊन त्वचा कोरडी पडते. अनेकदा आपण ही कामे टाळतो, ज्यामुळे सिंकमध्ये भांड्यांचा ढीग साचतो.
अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही स्मार्ट टीप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने कडाक्याच्या थंडीतही भांडी घासणे तुम्हाला कठीण वाटणार नाही.
१. थंड पाण्यात भांडी घासण्यासाठी रबरचे हातमोजे वापरणे हा उत्तम मार्ग आहे. हिवाळ्यात भांडी आणि कपडे धुताना हे खूप उपयुक्त ठरतात.
२. तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यात पाणी गरम करून भांडी घासू शकता. कोमट पाण्यामुळे भांड्यांवरील तेलकटपणा लगेच निघून जातो आणि जास्त मेहनत न घेता भांडी स्वच्छ होतात.
३. भांडी थेट थंड पाण्यात घासण्याऐवजी, सिंकमध्ये थोडे गरम पाणी आणि लिक्विड सोप टाकून त्यात भांडी १० मिनिटे भिजत ठेवा.
यामुळे भांड्यांवरील घाण आणि तेल निघण्यास मदत होते. त्यानंतर फक्त स्पंजने हलक्या हाताने घासल्यास भांडी चकचकीत होतात.
४. भांड्यांवरील खरकटे आणि तेलकटपणा साफ करण्यासाठी लांब दांड्याच्या ब्रशचा वापर करा. यामुळे भांड्यांची खोलवर स्वच्छता होते आणि तुमचे हातही पाण्यापासून लांब राहतात.
५. भांड्यांचा ढीग करण्यापेक्षा, एखादे भांडे खराब झाले की ते लगेच धुवून टाका.
दिवसभर भांडी साचवून ठेवल्याने ती धुण्यास जास्त वेळ लागतो आणि तुम्हाला बराच वेळ थंड पाण्यात काम करावे लागते, ज्यामुळे हात सुन्न होतात.