पुढारी वृत्तसेवा
‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला...’ असे म्हणत एकमेकांशी स्नेह वाढवण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत.
मात्र, या परंपरेमागे केवळ सामाजिक सलोखा नसून आरोग्याचे मोठे शास्त्र दडलेले आहे.
हिवाळ्याच्या काळात साजऱ्या होणाऱ्या या सणात तीळ आणि गुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तीळ हे उष्ण प्रकृतीचे असून, त्यामध्ये आरोग्याचा खजिना दडलेला आहे.
तिळामध्ये नैसर्गिक तेल आणि स्निग्धता असते, ज्यामुळे शरीराला आतून उष्णता मिळते आणि कोरड्या त्वचेचा त्रास कमी होतो.
हाडांच्या मजबुतीसाठी लागणारे कॅल्शियम तिळामध्ये भरपूर प्रमाणात असते.
तिळातील ‘ओमेगा-6’ फॅटी ॲसिडस् रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
गुळाला ‘सुपरफूड’ मानले जाते. गुळामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण (हिमोग्लोबिन) वाढण्यास मदत होते.
हिवाळ्यात पचनशक्ती मंदावते, अशावेळी जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचन सुधारते आणि विषारी घटक शरीराबाहेर पडतात.