पुढारी वृत्तसेवा
जीन्सच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्याशा खिशाचा उपयोग काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल.
फॅशनच्या दुनियेत जीन्सच्या या छोट्या खिशाला 'वॉच पॉकेट' म्हणून ओळखले जाते.
जीन्समध्ये हा छोटा खिसा देण्याची सुरुवात आजची नसून, तब्बल १५३ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १८७३ मध्ये झाली होती.
प्रसिद्ध जीन्स उत्पादक कंपनी 'लेव्हीज' आणि दर्जी जॅकब डेव्हिस यांनी मिळून सर्वात आधी असा खिसा असणारी जीन्स डिझाइन केली होती.
एकोणिसाव्या शतकात आजच्यासारखी मनगटी घड्याळे वापरली जात नव्हती. त्या काळात लोक 'पॉकेट वॉच' म्हणजेच साखळी असलेली गोल घड्याळे वापरत असत.
ही महागडी घड्याळे खिशातून पडून फुटू नयेत किंवा स्क्रॅच पडू नयेत, यासाठी जीन्समध्ये खास आकाराचा सुरक्षित खिसा तयार करण्यात आला.
हा खिसा घड्याळाच्या आकारानुसार अचूक बनवला गेला होता, जेणेकरून काम करताना घड्याळ सुरक्षित राहील.
काळाच्या ओघात पॉकेट वॉचची जागा मनगटी घड्याळे आणि स्मार्टफोनने घेतली असली, तरी जीन्सच्या फॅशनमधून हा खिसा बाद झाला नाही. आजही जीन्सला तिचा 'क्लासिक' आणि मूळ लूक देण्यासाठी हा खिसा अनिवार्य मानला जातो.
सध्याच्या काळात लोक या खिशात नाणी, अंगठी, इयरबड्स, पेनड्राइव्ह किंवा लहान चाव्या ठेवण्यासाठी याचा वापर करतात. त्यामुळे फॅशन बदलली असली, तरी इतिहास आजही जीन्सच्या रूपाने जपला गेला आहे.