पुढारी वृत्तसेवा
सकाळी आरशात पाहताना जेव्हा डोक्यावर एखादा पांढरा केस चमकतो, तेव्हा अनेकांच्या मनात धडकी भरते.
आपल्याला वाटते की, कदाचित वाढते वय किंवा कामाचे टेन्शन याला कारणीभूत आहे. पण केस पांढरे होण्यामागे निसर्गाचा एक रंजक वैज्ञानिक प्रवास दडलेला आहे.
आपल्या केसांचा मूळ रंग मेलेनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे ठरतो. केसांच्या मुळाशी असलेल्या विशेष पेशी हे मेलेनिन तयार करतात.
मात्र, जसजसे वय वाढते, तसतशा या पेशी मेलेनिनचे उत्पादन कमी किंवा बंद करतात. परिणामी, नवीन येणारा केस रंगाशिवाय म्हणजेच पांढरा किंवा करडा दिसू लागतो.
दुसरे एक मुख्य कारण म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. वाढत्या वयानुसार आपल्या केसांच्या मुळाशी हे रसायन नैसर्गिकरीत्या साचू लागते.
तरुणपणी शरीर हे रसायन नष्ट करते, पण वय वाढल्यावर ही यंत्रणा कमकुवत होते. मग हे हायड्रोजन पेरॉक्साईड केसांना आतून ब्लीच करायला सुरुवात करते.
याव्यतिरिक्त अनुवंशिकता, व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता आणि प्रचंड मानसिक ताण या प्रक्रियेला वेग देऊ शकतात.
त्यामुळे पांढरे केस हे केवळ वृद्धत्वाची खूण नसून शरीरातील अंतर्गत बदलांचा एक नैसर्गिक आरसा आहेत.