Goosebumps: अंगावर काटा येतो म्हणजे शरीरात नक्की काय घडतं? जाणून घ्या रंजक विज्ञान

पुढारी वृत्तसेवा

थरारक चित्रपट पाहताना, एखादे जुने गाणे ऐकताना किंवा कडाक्याच्या थंडीत अचानक आपल्या अंगावर शहारे येतात. अंगावरील केस ताठ उभे राहतात. पण असे का होते?

विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, आपल्या शरीरावरील प्रत्येक केसाच्या मुळाशी 'अरेक्टर पिली' नावाचा एक सूक्ष्म स्नायू असतो. हाच स्नायू या प्रक्रियेसाठी जबाबदार असतो.

जेव्हा आपल्याला थंडी वाजते किंवा भीती वाटते, तेव्हा आपली मज्जासंस्था या स्नायूंना संकेत देते. हे स्नायू एकाच वेळी आकुंचन पावतात.

यामुळे केसांच्या भोवतालची त्वचा वर उचलली जाते आणि केस ताठ उभे राहतात.

या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचे काम 'ॲड्रेनालाईन' हे संप्रेरक करते.

जेव्हा मेंदूला धोक्याची जाणीव होते, तेव्हा रक्तामध्ये तातडीने हे संप्रेरक सोडले जाते, ज्यामुळे अंगावर काटा येतो.

आपल्या पूर्वजांच्या अंगावर दाट केस होते. केस ताठ उभे राहिल्यावर त्यामध्ये हवा अडकून राहायची, जी 'इन्सुलेशन'चे काम करून शरीराला उब द्यायची.

मानवाचे केस कमी झाले, तरी ही यंत्रणा आजही शरीरात टिकून आहे.