shreya kulkarni
भारतीय परंपरेनुसार शून्य (०) ने शेवट होणारी रक्कम पूर्णत्व दर्शवते, आणि पूर्णत्व म्हणजे काहीतरी संपलेलं असं मानलं जातं. म्हणून १०० ऐवजी १०१ दिलं जातं म्हणजेच हे काहीतरी सुरू आहे, चालू राहो ही भावना. हे शुभ मानलं जातं.
शेवटी दिलेला "१" हा अंक अखंडतेचं, सातत्याचं प्रतीक मानला जातो. याचा अर्थ सतत वाढणारी संपत्ती, सुख आणि समृद्धी. त्यामुळे देणगी, दक्षिणा किंवा लग्नात दिल्या जाणाऱ्या रक्कमांमध्ये हा '१' जोडला जातो.
मंदिरात देणगी देताना किंवा कोणत्याही शुभकार्यात यज्ञ, पूजन इत्यादीमध्ये संकल्प करताना विशिष्ट रक्कम जाणीवपूर्वक दिली जाते. त्यामुळे त्यात '१' अधिक करून तिचं आध्यात्मिक महत्त्व वाढवलं जातं.
१००, ५००, १००० अशा रक्कमांमध्ये अंतिम "०" मरण, समाप्ती, थांबणे याचे प्रतीक मानले जातात. तर त्यात "१" अधिक केल्याने शुभता, जीवन, वाढ आणि चालू राहणं यांचे प्रतीक तयार होतं.
देणगी देणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की त्याने केवळ ठराविक आकड्याची देणगी न देता थोडी जास्त, "पूर्ण मनाने" दिली आहे. त्यामुळे १०० ऐवजी १०१ ही रक्कम मनःपूर्वक देण्यात आली आहे असं मानलं जातं.
१०१, ५०१, १००१ या रक्कमांमध्ये केवळ १ रुपयाचा फरक असतो, पण त्या अनेक धार्मिक, मानसिक आणि सांस्कृतिक अर्थांनी समृद्ध असतात. त्यामुळे भारतीय संस्कृतीत अशा रक्कमा शुभ मानल्या जातात आणि विशेष प्रसंगी दिल्या जातात.