why sleep after eating: दुपारी जेवल्यानंतर झोप का येते?

पुढारी वृत्तसेवा

दुपारच्या जेवणानंतर सुस्ती आणि झोप येतेय? ऑफिसमध्ये काम करताना डोळे जड होतायत? ही समस्या फक्त तुमचीच नाही, तर बहुतेकांची आहे. जाणून घ्या यामागचे नेमके कारण.

शरीराला काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा आपले आतडे आणि शरीर ते पचवण्यासाठी काम करू लागते. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होऊन आळस जाणवतो.

अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत कोलेसिस्टोकिनिन आणि ग्लुकागन सारखे हार्मोन्स तयार होतात. हे संप्रेरक मेंदूला 'डुलकी' घेण्याचे सिग्नल देतात, ज्यामुळे आपल्याला सुस्त वाटते

काही वेळा जेवणानंतर शरीरात 'सेरोटोनिन' वेगाने तयार होऊ लागते. हे हार्मोन झोपेचे नियमन करते, त्यामुळे जेवण झाले की लगेच झोपल्यासारखे वाटते.

पनीर, पालक, सोया, अंडी आणि टोफू यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ॲसिड असते. यामुळे सेरोटोनिन वाढते आणि झोप लवकर येते.

आहारात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर रक्तातील साखर अचानक वाढते आणि नंतर वेगाने कमी होते. या चढ-उतारामुळे शरीराला प्रचंड थकवा जाणवतो.

झोप टाळण्यासाठी उपाय

आहारात 'हाय फायबर' पदार्थांचा समावेश करा.

दुपारचे जेवण हलके असावे, एकाच वेळी जास्त जेवू नका.

जास्त अन्न पचनसंस्थेवर भार टाकते आणि आळस वाढवते.

रात्री ८ ते ९ तासांची पूर्ण झोप घ्या. जर रात्रीची झोप अपूर्ण असेल, तर दिवसभर थकवा जाणवेल आणि जेवल्यानंतर झोप अनावर होईल.