पुढारी वृत्तसेवा
आपण अंथरुणात शांत झोपतो. पण काही वेळा असं वाटतं की, अचानक झटक्याने जाग येते.
असं वाटतं की, आपण उंचीवरून पडतोय. त्यानंतर दचकून जाग येते.
या विचित्र समस्येमागे तितकेच मनोरंजक वैज्ञानिक कारण आहे.
इंग्लंडमधील बॅडफोर्ड इथे राष्ट्रीय आरोग्य सेवाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. आमिर खान यांनी यामागील कारण सांगितले आहे.
वैज्ञानिक भाषेत या समस्येला ‘हिपनिक जर्क’ असे म्हणतात.
तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे शरीर आणि स्नायू हळूहळू आरामाच्या मोडमध्ये जातात. कधी कधी तुमचा मेंदू या विश्रांतीचा चुकीचा अर्थ घेतो.
याचा अर्थ तुमचे शरीर सामान्यपणे झोपायला जात आहे; पण तुमच्या मेंदूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवते आणि तो तुमचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो.
‘पडण्याच्या’ या खोट्या धोक्याला मेंदू शरीराला एक शक्तिशाली सिग्नल पाठवून प्रतिसाद देतो, जेणेकरून तुम्ही स्वतःला सावरू शकता.
यामुळे अचानक धक्का बसतो, हालचाल होते किंवा अचानक जाग येते. हे सर्व काही सेकंदाच्या काही अंशात घडतं.