Mosquito: डास तुम्हालाच जास्त का चावतात? शास्त्रज्ञांनी शोधून काढली ४ धक्कादायक कारणे!

पुढारी वृत्तसेवा

खोलीत पाच-सहा लोक बसले आहेत, पण डास मात्र फक्त तुम्हालाच शोधून चावतात? तुमच्यासोबतही असेच घडते का? काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात!

अनेक जण मजेत म्हणतात की, "माझं रक्त गोड आहे, म्हणून डास जास्त चावतात". पण यामागे रक्ताची चव नसून काही वैज्ञानिक कारणे आहेत. डास आपली शिकार खूप विचार करून निवडतात.

आपण जेव्हा श्वास सोडतो, तेव्हा शरीरातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. डास हा वायू दुरूनच ओळखतात. जे लोक जास्त प्रमाणात श्वास सोडतात, त्यांच्याकडे डास लवकर आकर्षित होतात.

जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, तर तुम्हाला डास चावण्याची शक्यता जास्त असते. घामामध्ये असलेले काही विशिष्ट घटक आणि बॅक्टेरिया डासांना आपल्याकडे खेचून घेतात.

डास गरम शरीराकडे जास्त आकर्षित होतात. जर तुमच्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही नुकताच व्यायाम केला असेल, तर डास तुम्हालाच टार्गेट करतील.

तुम्हाला गडद रंगाचे कपडे आवडतात का? संशोधनानुसार, डास काळा, गडद निळा आणि लाल रंगाकडे पटकन आकर्षित होतात. त्यांना हे रंग अंधारातही लवकर दिसतात.

जर तुम्हाला डासांपासून वाचायचे असेल, तर शक्यतो फिकट रंगाचे कपडे घाला आणि शरीराची स्वच्छता राखा.

घरात पाणी साचू देऊ नका; साचलेले पाणी हे डासांच्या पैदाशीचे मुख्य ठिकाण असते.

मच्छरदानी किंवा खिडक्यांना जाळ्यांचा वापर करा; रात्री झोपताना हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.