Namdev Gharal
पावसाळा म्हणजे आरोग्याला जपण्यासाठी आहारात बदल करावा लागतो, पालेभाज्या या जरी पौष्टिक असल्यातरी त्या पावसाळ्यात खाण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.
आयुर्वेदानुसार आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार, पावसाळ्यात पालेभाज्या खाणे शक्यतो टाळावे किंवा खाताना प्रचंड काळजी घ्यावी.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाचनक्रिया मंद असते, जठराग्नी तसेच शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते पालेभाज्या या निसर्गात 'गुरु' (पचनास जड) आणि 'शीत' (थंड) गुणांच्या असतात.
आधीच मंदावलेल्या पचनशक्तीवर जर जड पालेभाज्या खाल्ल्या, तर त्या नीट पचत नाहीत आणि 'आम' (टॉक्सिन्स/अपक्व अन्नरस) तयार होतो. यामुळे गॅस, अपचन आणि पोटाचे आजार वाढतात.
तसेच पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणात किटक, बॅक्टेरिया, बुरशी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असतो यामुळे अशा भाज्यांचे सेवन झाल्यास शरीरात विषाणू प्रवेश करुन आजारी पडण्याचा धोका असतो
अनेकदा पुराचे किंवा दूषित पाणी या भाज्यांवर साचल्याने 'इन्फेक्शन' होण्याचा धोका जास्त असतो. या दिवसांत आपली पचनशक्ती (जठराग्नी) देखील मंदावलेली असते.
पावसाळ्यात शरीरात 'वात दोष' नैसर्गिकरित्या वाढलेला (प्रकोपित) असतो. पालेभाज्या शरीरात 'रूक्षता' (कोरडेपणा) वाढवतात, ज्यामुळे वात दोष आणखीनच भडकतो.
पावसाळ्यात वनस्पतींना मिळणारे पाणी हे शुद्ध नसते. जमिनीवर साचलेले दूषित पाणी शोषून घेतल्यामुळे या दिवसांत उगवणाऱ्या पालेभाज्यांमध्ये 'अम्ल' (आंबट/acidic) भाव वाढतो.
आयुर्वेदानुसार, अशा भाज्या खाल्ल्याने रक्तातील अशुद्धी (रक्तपित्त) वाढू शकते आणि त्वचेचे विकार (उदा. खाज सुटणे, पुरळ येणे) उद्भवू शकतात.