पुढारी वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचा नाश्ता म्हणजे झटपट तयार होणारा ब्रेड असतो.
वेळ वाचवण्यासाठी अनेकजण ब्रेड खातात, पण काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी ब्रेडचे सेवन धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते पुढील लोकांनी सक्तीने ब्रेड खाणे टाळले पाहिजे.
सिलियाक रोग असणारे रुग्ण
हा एक गंभीर ऑटोइम्यून आजार आहे. ब्रेडमध्ये 'ग्लूटेन' मोठ्या प्रमाणात असते. ग्लूटेन खाल्ल्याने या रुग्णांच्या लहान आतड्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे या लोकांनी ब्रेड पूर्णपणे वर्ज्य करावा.
ग्लूटेन संवेदनशीलता असलेले लोक
ज्यांना सिलियाक रोग नसला तरी, ग्लूटेन खाल्ल्यानंतर पोटात दुखणे, गॅस, पोट फुगणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या येतात, त्यांनी ब्रेड खाऊ नये.
गव्हाची ॲलर्जी असणारे
गहू खाल्ल्यानंतर शरीरात ॲलर्जीची लक्षणे (उदा. श्वास घेण्यास त्रास, खाज) दिसल्यास, ब्रेड खाणे तत्काळ बंद करणे आवश्यक आहे.
मधुमेह किंवा उच्च रक्त साखर असलेले रुग्ण
पांढरा ब्रेड मैद्यापासून बनलेला असतो आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते, जे मधुमेहींसाठी धोकादायक आहे.
यीस्ट ॲलर्जी
ब्रेड तयार करताना यीस्टचा वापर केला जातो. ज्यांना यीस्टची ॲलर्जी आहे, त्यांनी बमीरयुक्त ब्रेड खाणे टाळावे.
इर्रिटेबल बाऊल सिंड्रोमचे रुग्ण
IBS असलेल्या लोकांची पचनसंस्था खूप संवेदनशील असते. ब्रेडमुळे IBS ची लक्षणे जसे की पोटात पेटके येणे, वेदना आणि सूज वाढू शकतात.
वजन कमी करू इच्छिणारे लोक
पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर आणि पोषण मूल्ये कमी असतात, पण कॅलरीज जास्त असतात. याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते.
सतत बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांच्यासाठी फायबर नसलेला ब्रेड ही समस्या आणखी वाढवू शकतो.