पुढारी वृत्तसेवा
व्हाईट व्हिनेगर हे एक असे लिक्विड आहे ज्याचा उपयोग केवळ जेवणाची चव वाढवणेच नाही घरातील स्वच्छता, दुर्गंधी दूर करणे, कपड्यांची निगा आणि बागेतील कामांसाठी एक उत्तम, नैसर्गिक आणि स्वस्त पर्याय आहे.
मायक्रोवेव्हची स्वच्छता: एका काचेच्या बाऊलमध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी व्हिनेगर मिसळून मायक्रोवेव्हमध्ये ३ ते ५ मिनिटे चालू ठेवा. निर्माण होणाऱ्या वाफेमुळे आतील चिकटपणा सैल होतो आणि कपड्याने पुसून लगेच स्वच्छ होतो.
व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात एका स्प्रे बाटलीत भरून गॅस शेगडी, ओटा आणि टाइल्सवर स्प्रे करा. यामुळे तेलकट आणि चिकट डाग सहज निघून जातात.
स्टीलचे नळ किंवा पाण्याच्या भांड्यांवर क्षारांचे पांढरे थर जमा होतात. त्यावर व्हिनेगर लावून १०-१५ मिनिटे ठेवा आणि घासून धुवा, डाग निघून नळ चमकू लागतील.
कचऱ्याची बादली किंवा सिंकची दुर्गंधी: सिंकच्या ड्रेनमध्ये बेकिंग सोडा टाकून त्यावर गरम व्हिनेगर ओतल्यास दुर्गंधी आणि आतील अडकलेला मळ दूर होतो.
घामाचे डाग आणि वास दूर करणे: शर्टच्या अंडरआर्म्सवर पडलेले पिवळे घामाचे डाग आणि वास घालवण्यासाठी कपडे भिजवताना व्हिनेगरचा वापर करा.
रंग टिकवणे: नवीन गडद रंगाचे कपडे पहिल्यांदा धुताना पाण्यात थोडे व्हिनेगर घातल्यास त्यांचा रंग उडत नाही आणि कापडाची चमक टिकून राहते.
वॉशिंग मशिनची स्वच्छता: मशिन रिकामी असताना डिटर्जंट ड्रॉवरमध्ये किंवा ड्रममध्ये २ कप व्हिनेगर टाकून गरम पाण्याच्या सायकलवर चालवल्यास मशिनमधील क्षार आणि वास साफ होतो.
आरसे आणि खिडक्यांच्या काचा: एका स्प्रे बाटलीत ५०% पाणी आणि ५०% व्हिनेगर मिसळून काचेवर स्प्रे करा आणि वर्तमानपत्राने पुसा. काच न डागाळता एकदम चकचकीत होते.
खोलीत, फ्रीजमध्ये किंवा तीव्र वास येत असल्यास एका छोट्या वाटीत थोडे व्हिनेगर उघडे ठेवून द्या. व्हिनेगर हवेतील दुर्गंधी शोषून घेते.
लोखंडाचा गंज काढणे: गंजलेले नट-बोल्ट किंवा लहान अवजारे काही तास व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवल्यास गंज सैल होतो आणि सहज निघून जातो.