पुढारी वृत्तसेवा
प्रेमसंबंधांची चर्चा जेव्हा लग्नापर्यंत पोहोचते, तेव्हा सर्वात मोठा आणि कठीण टप्पा असतो तो म्हणजे 'गर्लफ्रेंडची कुटुंबाशी ओळख करून देणे'.
अनेकदा मुले या बाबतीत घाई करतात आणि त्याचे परिणाम नात्यात दुरावा किंवा घरगुती वादात होतात.
नात्यात स्पष्टता आल्यानंतरच हा निर्णय घेणे योग्य ठरते. जर तुम्हीही आपल्या जोडीदाराला घरी नेण्याचा विचार करत असाल, तर तज्ज्ञांनी दिलेल्या या काही महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात घ्या.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही नात्याला किमान ६ महिने ते १ वर्षाचा वेळ देणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एकमेकांचे चांगले गुण दिसतात, मात्र वेळ गेल्यानंतर स्वभाव, सवयी आणि विचारसरणीतील तफावत समोर येते.
नात्यातील चढ-उतार अनुभवल्यानंतर आणि एकमेकांवर पूर्ण विश्वास बसल्यानंतरच कुटुंबाचा विचार करावा.
कुटुंबाला भेटणे हा जोडीदारासाठी मानसिक दडपणाचा विषय असू शकतो. त्यामुळे केवळ स्वतःच्या इच्छेखातर जोडीदारावर दबाव टाकू नका.
जर तुमचा पार्टनर या भेटीसाठी मानसिकरीत्या तयार नसेल, तर घाई केल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. दोघांच्या परस्पर संमतीनेच हा निर्णय घेणे हिताचे ठरेल.
जर तुमचे नाते केवळ फिरण्यापुरते किंवा वेळ घालवण्यापुरते मर्यादित असेल, तर लगेच पालकांशी ओळख करून देणे टाळावे.
जोपर्यंत तुम्ही दोघेही भविष्याबद्दल आणि लग्नाबद्दल खात्रीशीर होत नाही, तोपर्यंत ही मोठी जबाबदारी न उचलणेच शहाणपणाचे ठरते.
तुमच्या नात्यात वारंवार भांडणे होत असतील किंवा ब्रेकअपपर्यंत वेळ येत असेल, तर अशा स्थितीत घरच्यांना मध्ये आणणे धोक्याचे ठरू शकते.
नाते आधी स्वतःच्या पातळीवर भक्कम आणि संतुलित करा. जे नाते स्वतःच्या पायावर उभे असते, तेच कुटुंबासमोर मांडणे सोपे जाते.
कुटुंबात आधीच काही वाद किंवा तणाव सुरू असेल, तर अशा वेळी नवीन विषयाची भर टाकू नका.
घरामध्ये एखादा आनंदाचा क्षण किंवा सकारात्मक वातावरण असतानाच ही चर्चा करणे योग्य ठरते.