पुढारी वृत्तसेवा
भाजी बनवताना लसूण जास्त पडला आणि संपूर्ण भाजीला लसणाचाच वास येतोय? काळजी करू नका! स्वयंपाकघरातील काही साध्या पदार्थांच्या मदतीने भाजीची चव पुन्हा संतुलित करता येते.
भाजीमध्ये लसूण खूप जास्त झाला असेल, तर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर उपयोगी ठरू शकतो. यामुळे लसणाचा तिखटपणा आणि तीव्र वास कमी होण्यास मदत होते.
एकदम जास्त आंबटपणा आणू नका. सुरुवातीला अर्धा चमचा लिंबाचा रस घालून भाजी चाखा. गरज वाटल्यास आणखी थोडा रस घाला.
लिंबाचा रस नसेल तर आमचूर पावडर किंवा टोमॅटोची प्युरी वापरू शकता. यामुळे भाजीच्या चवीत संतुलन येण्यास मदत होते.
ग्रेव्ही असलेली भाजी असेल तर २ ते ३ चमचे फेटलेले दही, दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम घाला. यामुळे लसणाची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि ग्रेव्ही अधिक मऊ व रिच होते.
दही घालताना गॅसची आच मंद ठेवा. तसेच दही चांगले फेटून हळूहळू मिसळा. यामुळे दही फाटण्याची शक्यता कमी होते.
भाजीमध्ये लसूण जास्त झाल्यास उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा घालू शकता. बटाट्यामुळे अतिरिक्त चव काही प्रमाणात शोषली जाते आणि भाजीचा स्वाद संतुलित होण्यास मदत होते.
कोरडी भाजी असेल तर थोडे भाजलेले बेसन वरून घाला आणि काही वेळ परतून घ्या. यामुळे भाजीचा पोत घट्ट होण्यासोबतच लसणाची तीव्र चव कमी होण्यास मदत होते.