पुढारी वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या युगात मोबाईलची बॅटरी संपली की, आपले अर्धे जग थांबल्यासारखे वाटते. अशा वेळी आपण घाईघाईत फोन चार्जिंगला लावतो.
अनेकजण सल्ला देतात की, अरे, फोन स्विच ऑफ करून चार्ज कर. लवकर होईल. पण खरेच असे होते का? की ही फक्त एक अफवा आहे... यामागचे विज्ञान समजून घेऊया.
जेव्हा तुमचा फोन चालू असतो, तेव्हा तुम्ही तो हातात धरलेला नसला तरी बॅकग्राऊंडमध्ये अनेक गोष्टी सुरू असतात. सिमकार्ड नेटवर्क शोधत असते, ॲप्स नोटिफिकेशन पाठवत असतात आणि प्रोसेसर काम करत असतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर जणू काही तुम्ही एका बादलीत पाणी भरताय आणि खालून एका छोट्या छिद्रातून ते गळत आहे. फोन बंद केल्यावर ही गळती थांबते.
प्रोसेसर, रॅम आणि नेटवर्क बंद झाल्यामुळे बॅटरीचा वापर शून्य होतो आणि चार्जरची सर्व ऊर्जा थेट बॅटरी साठवण्यासाठी वापरली जाते. पण हा वेग खरोखर चमत्कारिक असतो का? याचे उत्तर आहे, नाही.
फोन बंद करून चार्जिंग केल्यास वेगात साधारणतः 5 टक्के ते 15 टक्के इतकाच फरक पडतो. विशेषतः आधुनिक फास्ट चार्जिंग असलेल्या फोन्समध्ये हा फरक फारसा जाणवत नाही. कारण ते फोन चालू असतानाही बॅटरी मॅनेजमेंट उत्तम करतात.
मात्र, फोन बंद करून चार्ज करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बॅटरी हेल्थ.
चार्जिंग करताना फोन चालू असल्यास तो गरम होण्याची शक्यता जास्त असते. उष्णता हा बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू आहे.
तुमचा फोन जुना असेल किंवा लवकर गरम होत असेल, तर तो बंद करून चार्ज करणे तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी कधीही उत्तम ठरेल.