पुढारी वृत्तसेवा
वॉशिंग मशीनचा ड्रम स्वच्छ दिसत असला तरी त्यामध्ये साबणाचे अवशेष, मळ आणि बॅक्टेरिया साचू शकतात. यामुळे कपडे धुतल्यानंतरही त्यांना कुबट वास येऊ शकतो.
कपडे जास्त स्वच्छ व्हावेत म्हणून अनेकजण भरपूर डिटर्जंट वापरतात. पण जास्त साबण कपड्यांवर आणि मशीनमध्ये साचून दुर्गंधी निर्माण करू शकतो.
धुण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कपडे बराच वेळ मशीनमध्ये ठेवले तर त्यांना कुबट वास येऊ शकतो. त्यामुळे धुलाई पूर्ण होताच कपडे बाहेर काढा.
कपडे धुतल्यानंतर मशीनचा दरवाजा लगेच बंद करू नका. आतमध्ये ओलावा राहिल्यास बुरशी आणि दुर्गंधी वाढू शकते. मशीन कोरडे होण्यासाठी दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवा.
फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या दरवाजाजवळ असलेल्या रबर सीलमध्ये पाणी, केस आणि साबणाचे अवशेष अडकतात. त्यामुळे या भागाची नियमितपणे स्वच्छता करणे गरजेचे आहे.
डिटर्जंट आणि फॅब्रिक सॉफ्टनरच्या ट्रेमध्ये साबणाचे थर साचू शकतात. ट्रे बाहेर काढून स्वच्छ धुवा आणि पूर्ण कोरडी झाल्यानंतर पुन्हा लावा.
वॉशिंग मशीनच्या फिल्टरमध्ये धागे, केस आणि लहान कचरा अडकतो. त्यामुळे पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि दुर्गंधी येऊ शकते. कंपनीच्या सूचनांनुसार फिल्टर स्वच्छ करा.
मशीनमध्ये Tub Clean किंवा Drum Clean हा पर्याय असल्यास त्याचा वापर करा. मशीनच्या उत्पादकाने सुचवलेले क्लीनर वापरा. व्हिनेगर, ब्लीच किंवा इतर क्लीनर एकत्र मिसळू नका.
कपडे धुतल्यानंतर त्यांना हवेशीर ठिकाणी वाळत घाला. कपडे ओले असताना एकमेकांवर खूप वेळ ठेवल्यास त्यांना दुर्गंधी येऊ शकते. कपडे पूर्ण कोरडे झाल्यानंतरच कपाटात ठेवा.