Namdev Gharal
तुम्हाला माहिती आहे का भारतीय संस्कृती कोशा’च्या पाचव्या खंडानुसार, पंढरपूरचा पहिला उल्लेख इ.स. ५१५च्या राष्ट्रकूट राजा अविधेय याच्या ताम्रपटात ‘पांडरंगपल्ली’ या नावाने आहे.
या मदिंर कोणी बांधले याचा शोध घेतला तर असे लक्षात येईल की ११८९मध्ये येथे पहिल्यांदा लहान मंदिर बांधण्यात आले. १२३७मध्ये या मंदिरास होयसळ यादव राजा वीर सोमेश्वर याने कर्नाटकातील एक गाव दान दिले.
तर १२७३ मध्ये यादव राजा रामचंद्रदेव व त्याचा करणाधिपती हेमाद्रीपंडित यांनी पुढाकार घेऊन देवळाची वाढ केली. इ.स. १३०३ पर्यंत हे मंदिर बऱ्यापैकी मोठे झाले होते.
यानंतर अनेकदा या मंदिराचे नूतनीकरण, तसेच त्याच्यात वाढ करण्यात आली. असे सांगितले जाते की १६, १७ आणि १८व्या शतकात या मंदिराचे वेगवेगळे बांधकाम झालेले आहे. (फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर)
पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका उंच जागेवर हे मंदिर स्थित आहे. या भागाला पूर्वीपासून विठ्ठल टेकडी असे संबोधले जाते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची पूर्व-पश्चिम लांबी ११७ मीटर व दक्षिणोत्तर रुंदी ५८ मीटर आहे. (फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर)
मंदिराला पूर्वेकडून नामदेव पायरी, पुरषांच्या बारीचा दरवाजा व तरटी दरवाजा असे तीन दरवाजे आहेत. याशिवाय दक्षिणेकडे दोन, पश्चिमेकडे एक आणि उत्तरेकडे तीन असे एकूण नऊ दरवाजे आहेत. (फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर)
मंदिराच्या पूर्वद्वाराला महाद्वार अथवा नामदेव पायरी असे म्हटले जाते. या दरवाजाच्या पहिल्या पायरीला संत नामदेवांनी समाधी घेतली म्हणून संत नामदेवांची पायरी हे नाव पडले.
मंदिरात आतमध्ये अलंकारगृहाच्या पुढे सोळाखांबी मंडप आहे. हा मंडप सोळा दगडी खांबांवर उभा आहे. येथील खांबांवर महाभारतातील प्रसंग असणारी ६४ शिल्पे आहेत. शेणवी समाजातील श्रीमंत दौंडकर यांनी १८०२ मध्ये हा सोळाखांबी मंडप बांधल्याची नोंद आहे
विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहावर असलेले शिखर हे तुलनेने साधेसे आहे. या त्रिस्तरीय शिखरावर आठ गोपुरे आहेत. या शिखराची जमिनीपासून कळसापर्यंतची उंची ४८ फूट आहे. हे मराठा स्थापत्यशैलीतील शिखर १८३० मध्ये भोर संस्थानतर्फे बांधण्यात आले आहे.
संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांच्या मते, आषाढी आणि कार्तिकी वारीची परंपरा किमान तेराव्या शतकापासून सुरू आहे. सोळाखांबी मंडपाच्या तुळईच्या पूर्वभागात एक १२३७ चा एक शिलालेख असून त्यामध्ये ७१ व्या ओवीत वारीचा उल्लेख आहे (फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान पंढरपूर)