पुढारी वृत्तसेवा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या रणसंग्रामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आपला सलामीचा सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) खेळणार आहे.
गेल्या हंगामात RCB ने जेतेपदावर नाव कोरले होते आणि या विजयात विराट कोहलीने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर असलेल्या कोहलीने अनेक दिग्गज गोलंदाजांची पिसं काढली आहेत.
IPL मध्ये कोहली आणि अश्विन २३ डावांमध्ये आमने-सामने आले. यात अश्विनच्या १४९ चेंडूंचा सामना करताना कोहलीने १२१.४७ च्या स्ट्राइक रेटने १८१ धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, अश्विन कोहलीला केवळ एकदाच बाद करू शकला आहे. कोहलीने त्याच्याविरुद्ध १३ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत.
IPL च्या इतिहासात जडेजाने २१ डावांत कोहलीला गोलंदाजी केली आहे. यादरम्याने त्याने विराटला ३ वेळा बाद केले आहे. कोहलीने जडेजाच्या १६० चेंडूंमध्ये १११.८७ च्या स्ट्राइक रेटने १७९ धावा केल्या आहेत. यात १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.
वेगवान गोलंदाज उमेश यादवने कोहलीला ३ वेळा तंबूत धाडले आहे. मात्र, कोहलीनेही त्याला चोख प्रत्युत्तर देत अवघ्या ९६ चेंडूंत १७५ च्या तुफानी स्ट्राइक रेटने १६८ धावा कुटल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू २०१८ ते २०२१ दरम्यान RCB मध्ये सहकारी म्हणून खेळले आहेत.
अमित मिश्रा हा IPL इतिहासातील यशस्वी फिरकीपटूंपैकी एक असून त्यांच्या नावावर १७४ बळी आहेत. मिश्राने कोहलीला ३ वेळा बाद केले आहे. पण कोहलीनेही त्याच्या १०५ चेंडूंत १५४.२८ च्या स्ट्राइक रेटने १६२ धावा वसूल केल्या आहेत. या धावा करताना कोहलीने ७ षटकार आणि १३ चौकार लगावले आहेत.
कोहलीने ब्राव्होच्या १०३ चेंडूंत १५७ धावा केल्या आहेत, तर ब्राव्होने त्याला एकदा बाद केले आहे.
मुंबई इंडियन्सच्या या दिग्गज गोलंदाजाविरुद्ध कोहलीने १७ डावांत १०१ चेंडूंचा सामना करत १५० धावा (स्ट्राइक रेट १४८.५१) केल्या आहेत. मात्र, बुमराहने कोहलीला ५ वेळा बाद करून आपले वर्चस्वही सिद्ध केले आहे.