Viral Gastroenteritis : अतिउष्णतेमुळे वाढला पोटाच्या इन्फेक्शनचा धोका! काय काळजी घ्याल?

Namdev Gharal

सध्या उष्णतेने कमाल मर्यादा गाठली आहे, उष्ण आणि दमट वातावरणामुळे 'व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरायटिस' (Viral Gastroenteritis) म्हणजेच पोटात इन्फेक्शनचा धोका वाढला आहे

याला साधारणपणे पोटाचा फ्लू असे सामान्य भाषेत म्हटले जाते. . हा आजार प्रामुख्याने रोटाव्हायरस (Rotavirus) किंवा नोरोव्हायरस (Norovirus) सारख्या विषाणूंमुळे होतो.

कारणे काय : उन्हाळ्यात शरीराला थंड हवे असल्याने लोक बाहेरचे ज्यूस, लिंबू सरबत किंवा उसाचा रस पितात. यासाठी वापरला जाणारा बर्फ अनेकदा दूषित असू शकतो. हे पाणी विषाणूंचे मुख्य उगमस्थान ठरते.

उन्हाळ्यात कचरा, कुजलेले अन्न यांवर माशा मोठ्या प्रमाणावर बसतात. या माशा उघड्या अन्नावर आणि पाण्यावर बसून विषाणू पसरवतात.

जर विषाणू पोटात गेला, तर साधारण २४ ते ४८ तासांत खालील लक्षणे दिसू लागतात: पाण्यासारखे पातळ जुलाब होणे, उलट्या आणि मळमळ होणे, पोटात कळा येणे किंवा तीव्र दुखणे, हलका ताप आणि डोकेदुखी.

काय काळजी घ्यावी : उन्हाळ्यात पाणी नेहमी उकळून आणि कोमट करून प्या. बाहेर जाताना स्वतःच्या घरच्या पाण्याची बाटली सोबत ठेवा.

बाहेरचे खाणे टाळा: रस्त्यावरील उघडे अन्न, कापलेली फळे, आणि प्रामुख्याने 'बर्फ' वापरलेले पदार्थ किंवा पेय टाळावीत

हात स्वच्छ धुवा: जेवण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि वॉशरुमचा वापर केल्यानंतर हात साबण आणि स्वच्छ पाण्याने किमान २० सेकंद चोळून धुवा.

जुलाब आणि उलट्यांमुळे शरीरातील पाणी कमी होऊन डीहायड्रेशन (Dehydration) होण्याचा सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे हाच यावरील मुख्य उपाय आहे.

जुलाब किंवा उलटी सुरू झाल्यास लगेच ओआरएस (Oral Rehydration Salts) चे पाणी पिण्यास सुरुवात करा. घरच्या घरी लिंबू-पाणी, मिठाचे पाणी किंवा ताक प्या.

जर उलट्या थांबत नसतील, अतिप्रमाणात जुलाब, तीव्र ताप आला असेल किंवा लघवीचे प्रमाण खूप कमी झाले असेल, तर घरगुती उपायांवर विसंबून न राहता लगेच डॉक्टरांकडे जा