पुढारी वृत्तसेवा
टेनिस विश्वातील महान खेळाडूंपैकी एक असणारी आणि 7 वेळा ग्रँड स्लॅम विजेती व्हिनस विल्यम्स पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे.
18 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन 2026 साठी व्हिनसला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे.
वयाच्या 45 व्या वर्षी या स्पर्धेत उतरून ती ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी आजवरची सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरणार आहे.
व्हिनसने जपानच्या किमिको डेट हिचा विक्रम मोडीत काढला आहे. किमिको 2015 मध्ये वयाच्या 44 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती.
व्हिनसने याआधी 2021 मध्ये मेलबर्नमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता. आता 5 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर ती पुन्हा या ऐतिहासिक कोर्टवर पुनरागमन करत आहे.
नुकतेच डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात तिने डॅनिश मॉडेल आणि अभिनेता अँड्रिया प्रेटी याच्याशी फ्लोरिडा येथे विवाह केला. लग्नाच्या आनंदानंतर लगेचच तिने सरावाला सुरुवात केली असून ती ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यातील स्पर्धांसाठी सज्ज झाली आहे.
व्हिनसने 1998 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पदार्पण केले होते. आता 28 वर्षांनंतरही तिची जिद्द कायम आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी स्वतःला सिद्ध करण्यासाठी व्हिनस 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेतही सहभागी होणार आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेनंतर व्हिनसने जिद्दीने पुनरागमन केले आहे.