पुढारी वृत्तसेवा
तुळशीचे रोप फक्त वरच्या दिशेने उंच वाढून खालून रिकामे दिसत असेल, तर काळजी करू नका; काही सोप्या उपायांनी रोप सहज दाट करता येते.
रोपाची वरची शेंडे वेळेवर न छाटणे, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे आणि अवेळी पाणी देणे यामुळे रोप दाट होण्याऐवजी फक्त उंच वाढत जाते.
तुळशीच्या रोपाची वरची वाढणारी पाने किंवा शेंडा हलक्या हाताने खुडून टाका. ही जुनी आणि खात्रीशीर पद्धत आहे.
वरचा शेंडा कापल्यामुळे रोपाची वाढ एकाच दिशेने न होता बाजूने अनेक नव्या फांद्या फुटू लागतात आणि रोप चहूबाजूंनी दाट दिसू लागते.
तुळशीला मंजिरी (फुले किंवा बिया) आली की रोपाची पूर्ण ऊर्जा बिया तयार करण्यात खर्च होते. त्यामुळे जास्तीत जास्त पानांसाठी मंजिरी वेळेवर खुडा.
मंजिरी काढल्याने रोपाचे पोषण नव्या पानांच्या आणि फांद्यांच्या निर्मितीसाठी वापरले जाते, ज्यामुळे रोप कायम टवटवीत राहते.
तुळशीला चांगल्या वाढीसाठी थेट सूर्यप्रकाशाची गरज असते. सावलीत ठेवल्यास रोप बारीक आणि उंचट होते, पण त्याला पुरेशी पाने येत नाहीत.
कुंडीतील माती कोरडी वाटली तरच पाणी द्या. सतत किंवा गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास रोपाची मुळे कुजण्याची भीती असते.
कुंडीला खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र (Drainage hole) असल्याची खात्री करा, जेणेकरून मुळांजवळ पाणी साचून राहणार नाही.
फार चिकट माती वापरू नका; पाण्याचा योग्य निचरा होणारी भुसभुशीत माती वापरा. यामुळे मुळांचा विकास वेगाने होऊन तुळस नेहमी हिरवीगार आणि दाट राहील.