पुढारी वृत्तसेवा
दक्षिण अटलांटिक महासागराच्या मध्यभागी, जिथे समुद्राच्या लाटा अनंत पसरलेल्या आहेत तिथे जगातील सर्वात एकाकी बेटसमूह वसले आहे.
त्याचे नाव आहे ट्रिस्टन दा कुन्हा.
येथे ना विमानतळ आहे, ना रेल्वे आणि ना कोणतीही आधुनिक सुविधा.
तेथे पोहोचण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे जहाज!
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनपासून 2,800 किलोमीटर अंतरावर हा द्वीपसमूह आहे.
तिथून वर्षातून केवळ काही जहाजे पोहोचतात आणि प्रवासाला सुमारे 6 ते 7 दिवस लागतात.
या बेट समूहावरील लोकसंख्या केवळ 250 आहे. या बेटांपासून सर्वात जवळचे ठिकाण आहे ते सेंट हेलेना आणि तेसुद्धा 2 हजार 430 किलोमीटर अंतरावर आहे.
ट्रिस्टन दा कुन्हा या बेटांचा शोध 1506 मध्ये पोर्तुगीज खलाशी ट्रिस्टन दा कुन्हा यांनी लावला. परंतु तेथे वास्तव्यास 1816 उजाडावे लागले.
सात बेटांचा हा समूह ब्रिटनचा भाग आहे. तेथील सर्वांची आडनावे स्वॅन, ग्रीन, ग्रास किंवा पटेंडन अशीच आहेत.
या बेटांवरील जीवन म्हणजे निसर्गाशी संघर्षच मानला जातो.