Tooth Sensitivity: दातांमध्ये झिणझिण्या का येतात? कारणे आणि घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

गरम चहाचा घोट असो किंवा थंडगार आईस्क्रीम... अनेकदा दातांमध्ये अचानक तीव्र झिणझिण्या जाणवतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'टूथ सेन्सिटिव्हिटी' म्हणतात.

ही समस्या नेमकी का उद्भवते?

दातांचे सर्वात वरचे नैसर्गिक कवच म्हणजेच 'इनॅमल' नष्ट झाले की, दातांच्या आतील मऊ नसा उघड्या पडतात.

यामुळे थंड, गरम, गोड किंवा आंबट पदार्थांचा थेट संपर्क नसांशी येतो आणि झिणझिण्या जाणवतात.

अनेकांना दात खूप जोरात घासण्याची सवय असते. यामुळे दात स्वच्छ होत नाहीत, उलट इनॅमलची झीज होते आणि हिरड्या मागे सरकतात. परिणामी, संवेदनशीलता वाढते.

काही लोक झोपेत नकळत दात चावतात. या दाबामुळे दातांचे कवच कमकुवत होते आणि कालांतराने दात ठिसूळ बनून झिणझिण्या सुरू होतात.

काही वेळा दात भरणे, रूट कॅनॉल किंवा दात पांढरे करणे यांसारख्या ट्रीटमेंटनंतर काही दिवस दात संवेदनशील होऊ शकतात. मात्र, हा त्रास सहसा तात्पुरता असतो.

घरगुती उपाय

दंत संवेदनशीलतेसाठी उपलब्ध असणारी फ्लोराईडयुक्त टूथपेस्ट वापरा. यामुळे दातांभोवती एक संरक्षणात्मक थर तयार होतो आणि झिणझिण्या थांबतात.

नेहमी 'सॉफ्ट ब्रिसल्स' (मऊ धागे) असलेला ब्रश निवडा.

दात घासताना हलक्या हाताने वर्तुळाकार हालचाली करा, जेणेकरून इनॅमल सुरक्षित राहील.

अति प्रमाणात लिंबू, संत्री, सोडा किंवा साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.

हे पदार्थ दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरतात आणि इनॅमल नष्ट करतात.

कोमट मिठाच्या पाण्याचे गुळण्या करा. यामुळे हिरड्यांची सूज कमी होते.

दातांमधील वेदना आणि झिणझिण्या कमी करण्यासाठी लवंग तेल लावणे अत्यंत प्रभावी ठरते.

दिवसातून दोनदा ब्रश करा आणि फ्लॉसिंगची सवय लावा.

दातांवर साचलेला थर स्वच्छ करण्यासाठी चांगल्या दर्जाचे माऊथवॉश वापरा.