Gold plating jewelry: 'गोल्ड प्लेटेड' ज्वेलरी घेताना फक्त 'या' ५ गोष्टी तपासा

पुढारी वृत्तसेवा

सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडेनासे झाले आहेत. मात्र, सण-समारंभ आणि लग्नसराईत सोन्याच्या दागिन्यांची ओढ महिलांमध्ये कायम असते.

सोन्याला पर्याय म्हणून सध्या बाजारपेठेत 'गोल्ड प्लेटेड' म्हणजेच सोन्याचा मुलामा दिलेल्या दागिन्यांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

हे दागिने दिसायला हुबेहूब सोन्यासारखे आणि खिशाला परवडणारे असले, तरी त्यांची खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

गोल्ड प्लेटेड ज्वेलरीमध्ये चांदी, तांबे किंवा निकेलपासून तयार केलेल्या दागिन्यांवर सोन्याचा एक अतिशय पातळ थर चढवला जातो.

ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने प्रत्येक ठिकाणच्या दागिन्यांची गुणवत्ता सारखी नसते. त्यामुळे अशा दागिन्यांची चमक किती काळ टिकेल, हे पूर्णपणे त्याच्या मेकिंगवर अवलंबून असते.

गोल्ड प्लेटेड दागिने कोणत्याही साध्या दुकानातून घेण्यापेक्षा नामांकित ब्रँड किंवा विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच घ्यावेत.

गोल्ड प्लेटेड दागिन्यांचे पुनर्विक्री मूल्य नगण्य असते. यात सोन्याचा वापर अतिशय कमी असल्याने केवळ दागिन्यांच्या घडणावळीची किंमत मोजली जाते.

जर तुम्हाला सोन्यात मोठी गुंतवणूक करणे शक्य नसेल, तर फॅशन म्हणून गोल्ड प्लेटेड दागिने हा एक उत्तम पर्याय आहे.

कपड्यांच्या मॅचिंगनुसार तुम्ही विविध डिझाइन्सचे दागिने घेऊ शकता. मात्र, याला दीर्घकालीन गुंतवणूक न समजता 'स्टाईल स्टेटमेंट' म्हणून पाहणे फायदेशीर ठरेल.

सोन्याचा मुलामा दिलेले दागिने रोजच्या वापरासाठी योग्य नसतात. दररोज वापरल्यास घाम आणि पाण्यामुळे सोन्याचा थर लवकर निघून जाण्याची शक्यता असते.

गोल्ड प्लेटेड दागिन्यांची चमक एक ते दोन वर्षे टिकते. त्यानंतर त्यांचा रंग फिका पडू लागतो. त्यामुळे स्वस्त मिळतात म्हणून खरेदी करताना त्यांचा टिकाऊपणा तपासून पाहणे गरजेचे आहे.

दागिन्यांची चमक जास्त काळ टिकवण्यासाठी ते परफ्यूम, पाणी आणि आर्द्रतेपासून दूर ठेवावेत. तसेच मऊ कपड्यात गुंडाळून ठेवल्यास त्यांचा रंग बराच काळ टिकून राहतो.