पुढारी वृत्तसेवा
मानेमध्ये असलेली थायरॉईड ग्रंथी T3 आणि T4 संप्रेरके तयार करते, जी चयापचय क्रिया आणि ऊर्जेची पातळी नियंत्रित करतात.
या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास हार्मोन्स कमी किंवा जास्त प्रमाणात तयार होऊ शकतात. त्यामुळे थकवा, वजनात बदल, मूडमध्ये चढ-उतार आणि इतर समस्या जाणवू शकतात. अशा वेळी योग्य आहार आणि औषधोपचार महत्त्वाचे ठरतात.
थायरॉईडच्या रुग्णांनी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे?
थायरॉईडच्या रुग्णांनी लाल मांस खाणे टाळावे. यात असलेले उच्च कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्समुळे वजन वेगाने वाढू शकते.
थायरॉईडच्या आजारात आधीच वजन वाढण्याची समस्या असते, अशा वेळी रेड मीटमुळे ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
ग्लुटेनचे सेवन मर्यादित ठेवा
गहू, मैदा आणि ओट्समध्ये आढळणारे 'ग्लुटेन' थायरॉईडच्या रुग्णांमध्ये वजन वाढण्यासोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढवू शकते.
या पदार्थांना पूर्णपणे बंद करणे कठीण असू शकते, परंतु त्यांचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
ग्रीन टी, कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवनही टाळा
थायरॉईडच्या रुग्णांनी ग्रीन टीचे अतिसेवन करू नये. त्यामध्ये असलेले घटक थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करू शकतात. कॅफीन आणि अल्कोहोल थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करतात आणि औषधांचा प्रभावही कमी करू शकतात.
कोबी, मुळा आणि सोयाबीन खाणे बंद करावे का?
कोबी, फ्लॉवर, मुळा आणि सोयाबीन यांसारखे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ल्यास बहुतेक थायरॉईड रुग्णांसाठी सुरक्षित असतात.
मात्र, आयोडीनची कमतरता असल्यास काही पदार्थांचे अतिसेवन त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी आहारात योग्य प्रमाण राखा.
जंक फूडपासून दूर राहा
तळलेले पदार्थ, बर्गर, पिझ्झा आणि अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि चरबी जास्त असू शकते.
अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरगुती, संतुलित आहाराला प्राधान्य द्या.