पुढारी वृत्तसेवा
ऋतू बदलला किंवा थोडी थंडी वाढली की, अनेकांना घसादुखीचा त्रास सुरू होतो. काही पारंपरिक आणि घरगुती उपाय घसादुखीवर ॲन्टिबायोटिक्सपेक्षाही अधिक प्रभावी ठरतात.
मध : मध खाणे हा एक प्रभावी उपाय आहे. श्वसनमार्गाच्या संसर्गावर मध हा ॲन्टिबायोटिक्स आणि अँटीहिस्टामाइनपेक्षाही लक्षणे कमी करण्यात अधिक प्रभावी आहे.
मिठाच्या पाण्याने गुळण्या:
कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाला आराम मिळतो, कफ पातळ होतो आणि जिवाणू कमी होतात.
बेकिंग सोडा आणि मीठ गुळण्या:
मिठाच्या पाण्यासोबत बेकिंग सोडा मिसळून गुळण्या केल्यास जिवाणू आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते.
पुदीना
पुदिन्यामध्ये दाहक-विरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. यातील ‘मेन्थॉल’ कफ पातळ करून घसादुखी आणि खोकला शांत करतो. पुदिन्याचा गरम चहा किंवा तेलाचे स्प्रे वापरणे उपयुक्त ठरते.
लसूण
लसणात नैसर्गिक जिवाणूविरोधी गुणधर्म आहेत. यात असलेल्या ‘ॲलिसिन’ या संयुगामुळे ते व्हायरल संसर्गाशी लढण्यास मदत करते. आहारात ताज्या लसणाचा वापर केल्यास किंवा लसणाची पाकळी चघळल्यास घसादुखी कमी होऊ शकते.
सूप किंवा रस्सा
गरम सूप घेतल्यास घशाला आराम मिळतो. चिकन सूप हे रोगप्रतिकारशक्ती वाढवून जळजळ कमी करण्यास मदत करते.
गरम पाण्याची वाफ
कोरडी हवा घसादुखी वाढवते. गरम पाण्याची वाफ घेतल्यास घसादुखीमध्ये आराम मिळतो. एका भांड्यात गरम पाणी घेऊन, डोक्यावर टॉवेल घेऊन तोंड आणि नाकातून १० ते १५ मिनिटे वाफ घ्यावी.
वरील उपाय हे प्राथमिक उपचारांसाठी आहेत. जर घसादुखी गंभीर असेल, ताप येत असेल किंवा लक्षणे कमी होत नसतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.