Thorny Devil facts : हा सरडा तोंडाने नाही तर त्‍वचेव्दारे पाणी पितो

Namdev Gharal

थॉर्नी डेव्हिल (Thorny Devil), हा सरडा निसर्गाचा एक चमत्कार आहे. असे म्हटले तर वावगे ठरु नये कारण हा सरडा पाणी पिण्यासाठी आपल्या त्‍वचेचा वापर स्ट्रॉ सारखा करतो.

हा सरडा प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या उष्ण आणि कोरड्या वाळवंटी भागात आढळतो. याचे वैशिष्ट्य सरडा आपल्या तोंडाने पाणी पीत नाही, तर त्याच्या त्वचेचा वापर 'स्ट्रॉ' सारखा करतो.

त्याच्या अंगावर असलेल्या काट्यांच्या दरम्यान अतिशय बारीक नळ्या किंवा खोबणी असतात.

जेव्हा या सरड्याचा पाय ओल्या वाळूला लागतो किंवा त्याच्या अंगावर दव पडते, तेव्हा 'कॅपिलरी ॲक्शन'मुळे ते पाणी आपोआप ओढले जाते.

ही त्वचा पाणी शोषून घेत नाही, तर ते पाणी त्या बारीक नळ्यांमधून वाहत थेट त्याच्या तोंडाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचते. तिथे हा सरडा फक्त आपले जबडे हलवून ते पाणी गिळतो.

म्हणजेच, हा सरडा चिखलात उभा राहिला तरी त्याच्या शरीरावरील नळ्या पायाकडून पाणी ओढून थेट तोंडापर्यंत नेतात

थॉर्नी डेव्हिल हा वाळवंटी वातावरणासाठी पूर्णपणे अनुकूल झाला आहे. तो अनेक महिने थेट पाणी न पिता जगू शकतो.

त्याला जगण्यासाठी लागणारा ओलावा तो रात्री पडणाऱ्या दवातून किंवा वाळूतील थोड्याफार ओलाव्यातून (त्वचेद्वारे) मिळवतो.

हा सरडा फक्त मुंग्या खातो. एका दिवसात तो साधारण ६०० ते २,५०० मुंग्या फस्त करू शकतो. या मुंग्यामधूनही तो शरिराला लागणारे पाणी मिळवतो