पुढारी वृत्तसेवा
इनफर्टिलिटी (वंध्यत्व) च्या प्रकरणांमध्ये काही ना काही आरोग्य समस्या कारणीभूत असतात.
काही वेळा रोजच्या सवयीही यासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतात.
गायनॅकोलॉजिस्ट सांगतात की, रोजच्या काही सवयींमुळे शुक्राणूंची (स्पर्म) गुणवत्ता बिघडते.
पुरुषांनी खूप घट्ट अंतर्वस्त्र घातल्याने उष्णता वाढून त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होवू शकतो.
इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये डॉ. समरा मसूद सांगतात की, चुकीच्या अंडरवेअर घातल्यामुळे पुरुषांची अपत्यप्राप्तीची शक्यता कमी होऊ शकते.
पुरुष खूप घट्ट अंडरवेअर घालत असतील, तर टेस्टिकल्सच्या (अंडकोषांच्या) आजूबाजूला उष्णतेचा प्रभाव वाढतो. गायनॅकोलॉजिस्ट सांगतात, तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने वाढले, तरी स्पर्मटोजेनेसिस कमी होते, ज्यामुळे स्पर्म काउंट घटतो.
डॉ. मसूद पुढे सांगतात की, जास्त उष्णतेमुळे शुक्राणूंचा आकार (शेप) बिघडू शकतो आणि त्यांची हालचाल करण्याची क्षमता कमी होते. यामुळे शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान होते.
शेवटी तज्ज्ञ म्हणतात की, जर पुरुष ४ ते ६ तास किंवा त्याहून अधिक वेळ घट्ट जिमचे कपडे घालून राहिले, किंवा संपूर्ण दिवस स्किनी अथवा टाइट जीन्स घालत असतील, तर टेस्टिकल्सपर्यंत ऑक्सिजन आणि पोषकद्रव्यांचा पुरवठा योग्यरीत्या होत नाही. त्यामुळे उष्णता वाढते.
मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्यानेही उष्णतेचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. म्हणून अशा सवयी टाळाव्यात.