पुढारी वृत्तसेवा
आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे; पण तुम्हाला माहीत आहे का, जगात असा एक समुद्र आहे, जो इतका खारा आहे की, त्याला मृत समुद्र असे म्हणतात.
या समुद्रात एक सेकंदापेक्षा जास्त काळ कोणताही जलचर प्राणी जिवंत राहू शकत नाही आणि मनुष्यानेही इथे 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहू नये.
हा मृत समुद्र जॉर्डन (पूर्वेला) आणि इस्रायल-पॅलेस्टाईन (पश्चिमेला) यांच्यामध्ये स्थित आहे. याची सर्वात मोठी ओळख म्हणजे, याचे पाणी सामान्य समुद्राच्या पाण्यापेक्षा दहा पटीने अधिक खारे आहे.
यात जवळजवळ 34 टक्के मिठाचे प्रमाण आहे. लाखो वर्षांपूर्वी झालेल्या भूगर्भीय हालचालींतून हा समुद्र तयार झाला.
याचे पाणी कधीही बाहेर वाहत नाही, त्यामुळे हजारो वर्षांपासून इथे सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे जमा झाली आहेत.
याच्या आजूबाजूला वाळवंटी प्रदेश असल्याने सतत बाष्पीभवन होते आणि पाणी कमी होऊन मिठाचे प्रमाण वाढत जाते. या प्रचंड खारटपणामुळे, मृत समुद्रात मासे, वनस्पती किंवा शेवाळ यासारखे सजीव अजिबात तग धरू शकत नाहीत.
येथील खारटपणा पेशींमधील पाणी शोषून घेतो. त्यामुळेच याला मृत समुद्र असे नाव पडले आहे. मात्र, याच कारणामुळे हे ठिकाण एक मोठे पर्यटनस्थळ बनले आहे.
या समुद्राच्या पाण्यात पडल्यावर माणूस कधीही बुडत नाही, तर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहतो. हे ठिकाण जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे.