Sweet Potato | पोषण देणारी रताळी उकडून खावी का भाजून, जाणून घ्या योग्य पद्धत!

पुढारी वृत्तसेवा

सर्वसाधारणपणे पाहीले तर आरोग्य आणि पोषणाच्या दृष्टीने रताळी उकडून खाणे भाजण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरते.

रताळी पाण्यात उकडल्यास त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण ४४ ते ५० दरम्यान राहतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. त्यामुळे मधुमेही आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी उकडलेली रताळी उत्तम ठरतात.

बीटा-कॅरोटीन टिकून राहते: उकडल्यामुळे त्यातील बीटा-कॅरोटीन (व्हिटॅमिन 'ए') टिकून राहते आणि शरीर ते सहज शोषून घेऊ शकते.

पचनास हलकी: पाण्यामुळे त्यातील फायबर मऊ होते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

भाजलेली रताळी

ही चवीसाठी उत्तम ठरतात पण यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहींसाठी योग्य ठरत नाहीत

रताळी आचेवर किंवा ओव्हनमध्ये भाजताना उष्णतेमुळे स्टार्चचे रूपांतर साध्या साखरेत (माल्टोज) होते. त्यामुळे त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढून ८० ते ९० पर्यंत जातो.

वर्कआउट करणाऱ्यांना किंवा खेळाडूंना लगेच ऊर्जा हवी असल्यास भाजलेली रताळी फायदेशीर ठरतात. मात्र, मधुमेहींनी भाजलेली रताळी खाणे टाळावे.

नैसर्गिक गोडवा: भाजल्यामुळे पाणी कमी होते आणि चव अतिशय गोड व छान लागते. अनेक जण त्‍यामुळे रताळी भाजून खाण्यास पसंती देतात

रताळी उकडलेली किंवा भाजलेली खाताना शक्यतो सालासकट खावीत, कारण सालामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

त्यातील व्हिटॅमिन 'ए' शरीरात पूर्णपणे शोषले जावे यासाठी त्यावर थोडे तूप किंवा लिंबाचा रस घालून खाणे अधिक उपयुक्त ठरते.