Sunday Weekly off History : रविवारीच साप्ताहिक सुट्टी का? काय आहे यापाठीमागचा रंजक इतिहास!

Namdev Gharal

भारतात रविवारी शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये, बँका, व इतर अनेक ठिकाणी रविवारीच सुट्टी असते. तुम्हाला माहिती आहे का या पाठीमागे एका मराठी माणसाचा व कष्टकऱ्यांचा लढा आहे

ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी सुट्टी मिळत असे; परंतु भारतीय गिरणी कामगारांना आठवड्याचे सातही दिवस सलग १२ तास राबवले जाई.

भारतीय कामगार चळवळीचे जनक व महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी या विरुद्व लढा उभारला.

त्यांनी ब्रिटीश सरकारसमोर असा युक्तिवाद मांडला की, मिलमधील कामगार आठवड्याचे ६ दिवस मेहनत करतात, त्यामुळे आठवड्यातील १ दिवस त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि श्रमपरिहारासाठी सुट्टी हवी

तसेच हिंदू परंपरेनुसार रविवार हा सूर्यदेवाचा (आदित्यवार) वार मानला जातो, या दिवशी आम्ही खंडोबाची पूजा करतो यामुळे या दिवशी आम्हाला सुट्टी मिळायला हवी असाही युक्तिवाद केला

ब्रिटिश सरकारने सुरुवातीला ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी तीव्र आंदोलने आणि मोर्चे काढले.

पण इंग्रजांनी सहजासहजी ही मागणी मान्य केली नाही सलग ८ वर्षे त्‍यांनी या मागणीसाठी लढा दिला. अखेर ब्रिटिश सरकारला नमते घेत १० जून १८९० रोजी रविवारची अधिकृत सुट्टी जाहीर करावी लागली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती परंपरा: जागतिक पातळीवर ३२१ ई.स. मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईनने पहिल्यांदा रविवार हा ख्रिस्ती धर्मातील प्रार्थनेचा आणि विश्रांतीचा दिवस घोषित केला होता.

पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही सर्व देशांसाठी आठवड्यातून किमान एक दिवस विश्रांती अनिवार्य केली, ज्यासाठी रविवार सर्वाधिक स्वीकारला गेला.