पुढारी वृत्तसेवा
तुमचे मूल खाणे टाळत असेल, कमी खात असेल, त्याला खाण्याबद्दल भीती किंवा चिंता वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.
हे इटिंग डिसऑर्डरचे लक्षण असू शकते, जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते.
मात्र, प्रत्येक वेळी जेवण आवडत नाही म्हणजे इटिंग डिसऑर्डर नाही.
पण दीर्घकाळ डिसऑर्डरची लक्षणे राहिल्यास यामुळे मुलांना अशक्तपणा, हार्मोनल असंतुलन, हृदय, पचन, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेच्या ‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’च्या संशोधनानुसार, भारतात सुमारे 17.2 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये इटिंग डिसऑर्डरचा धोका आढळला आहे.
विशेषतः, ताणतणाव, सोशल मीडियाचा जास्त वापर आणि शरीराच्या प्रतिमेबद्दलची चिंता, यामुळे इटिंग डिसऑर्डरचा धोका वाढतो.
त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याच्या सवयी आणि वर्तनाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
विशेषत:, जेव्हा हे वर्तन सतत राहते आणि वजन, उंची, वाढ, ऊर्जा किंवा मनःस्थितीवर परिणाम दिसतो तेव्हा पालकांनी मुलांना वेळच्या वेळी जेवण्याचे महत्त्व मुलांना समजावून देण्याची गरज आहे.