पुढारी वृत्तसेवा
दुधाला आपण 'पूर्णान्न' म्हणतो आणि ते खरेच आहे; मात्र दुधाचे सेवनही योग्य मर्यादेतच करावे लागते, अन्यथा त्याचे दुष्परिणाम उद्भवू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.
तज्ज्ञांच्या मते, तरुण आणि ज्येष्ठांनी दररोज दोन ग्लास दूध प्यावे. त्यापेक्षा जास्त प्रमाणात दूध पिणे टाळावे.
दिवसभरात चहा, कॉफी आणि मिल्कशेकमधून पोटात जाणाऱ्या दुधाची मात्रासुद्धा या मर्यादेपेक्षा जास्त नसावी. तसेच, जर तुम्ही दही आणि पनीरचे सेवन करत असाल, तर एक ग्लास दूध पिणे पुरेसे आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ नुसार, दुधात प्रोटीन आणि व्हिटॅमिनसोबतच 'फॅट'देखील असते. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात फॅट जमा होऊन हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
१. हाय कोलेस्ट्रॉलची समस्या:
दूध अतिप्रमाणात प्यायल्यास हाय कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होऊ शकते. दुधात फॅट आणि कॅलरीज जास्त असतात. याच्या अतिसेवनाने वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो.
२. हाडे कमजोर होणे:
दूध हाडांना बळकटी देते; मात्र, ते जास्त प्रमाणात प्यायल्यास हाडांचे नुकसान होऊ शकते. दुधात 'डी-गॅलेक्टोज' ही नैसर्गिक साखर असते. याचे प्रमाण वाढल्यास हाडांवर विपरीत परिणाम होऊन ती कमजोर होतात.
३. मधुमेहाचा धोका:
अतिप्रमाणात दूध प्यायल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो. विशेषतः 'फुल क्रीम' दुधाच्या सेवनाने ब्लड शुगर वाढण्याची शक्यता जास्त असते.
४. वजन वाढणे:
दुधात फॅटचे प्रमाण अधिक असते. तसेच उच्च कॅलरीमुळे वजन वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना आहारात डेअरी प्रॉडक्ट्सचा अतिवापर टाळावा.
५. फॅटी लिव्हरची समस्या:
दुधात असलेले फॅट यकृताला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात दूध पिणे टाळावे.