पुढारी वृत्तसेवा
पांढरा किंवा फिकट रंगाच्या शर्टचा कॉलर खूप लवकर मळतो. घाम, धूळ आणि तेलामुळे कॉलरवर पडलेले पिवळे-काळे डाग घरगुती उपायांनी कसे काढायचे? जाणून घ्या.
१. बेकिंग सोड्याची जादू
२ चमचे बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा आणि ती मळलेल्या कॉलरवर लावा.
पेस्ट लावल्यानंतर बोटांच्या किंवा जुन्या टूथब्रशच्या मदतीने कॉलर हलक्या हाताने घासून घ्या. १५ मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्या. नंतर शर्ट नेहमीप्रमाणे धुवून टाका.
२. व्हिनेगर उपाय
व्हिनेगरमधील नैसर्गिक घटक कपड्यांवरील डाग आणि मळ घालवतात. कॉलरच्या मळलेल्या भागावर थोडे व्हाईट व्हिनेगर टाका आणि १० मिनिटांसाठी तसेच सोडून द्या.
१० मिनिटांनंतर मऊ ब्रश किंवा कापडाच्या मदतीने कॉलर हलक्या हाताने रगडूत स्वच्छ पाण्याने धुवा. घामामुळे पडलेले पिवळे डाग घालवण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
३. लिंबू आणि मिठाचा वापर
एका लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळा. हे मिश्रण कॉलरवर लावून २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने घासा आणि काही वेळाने शर्ट धुवून घ्या. फिकट रंगाच्या शर्टसाठी हा उपाय गुणकारी आहे.
४. भांडी घासण्याचे लिक्विड
डिशवॉशिंग लिक्विड हे तेलकट डाग काढण्यासाठी प्रभावी ठरते. कॉलरवर लिक्विड लावून जुन्या टूथब्रशने हलके स्क्रब करा आणि ५-१० मिनिटांनी धुवून घ्या.
५. टूथपेस्टने चमकेल कॉलर
कॉलरवर थोडी पांढरी टूथपेस्ट लावा आणि ब्रशने हळूहळू घासा. ५ मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ करा. लहान आणि फिकट डाग साफ करण्याचा हा सोपा मार्ग आहे.
कॉलर साफ करताना कधीही खूप कडक किंवा खरखरीत ब्रश वापरू नका, यामुळे कपड्याचे धागे खराब होऊ शकतात. तसेच, उपाय कपड्याच्या एखाद्या छोट्या आतल्या भागावर करून पहावा.
पांढऱ्या कपड्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी ते नेहमी इतर रंगीत कपड्यांपासून वेगळे धुणे केव्हाही उत्तम ठरते.