Nimbu Mirchi | लिंबू मिरची बांधण्यामागचे सायन्स काय आहे? ‘अलक्ष्मी’ दारातून परत जाते का?

Namdev Gharal

नवीन गाडी घेतली किंवा आमावस्येला घरी, वाहनांना आपण लिंबू मिरची बांधतो, ही प्रथा फार प्राचीन आहे या पाठीमागे जरी लोकश्रद्धा असली तरी वैज्ञानिक कारण देखील आहे.

हिंदू पौराणिक कथेनुसार, संपत्तीची देवी 'लक्ष्मी' हिची एक मोठी बहीण आहे, जिचे नाव 'अलक्ष्मी' , अलक्ष्मी ही जिथे जाते तिथे गरिबी, भांडणे आणि संकटे घेऊन जाते. त्यामुळे तिला घरात येण्यापासून रोखणे गरजेचे असते.

अलक्ष्मीला तिखट, आंबट आणि कडू वस्तू अत्यंत आवडतात. जेव्हा घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दारावर लिंबू आणि तिखट मिरची टांगली जाते, तेव्हा दारात आलेली अलक्ष्मी तिचे आवडते अन्न दारातच खाते तिथूनच निघून जाते, अशी धारणा आहे.

पण वैज्ञानिक कारण पाहिले तर लिंबू आणि मिरचीमध्ये सायट्रिक ॲसिड आणि कॅप्सेसिन (Capsaicin) सारखे तीव्र घटक असतात. जेव्हा सुईने लिंबू आणि मिरची एकत्र ओवली जाते, तेव्हा त्यातून एक विशिष्ट सुगंध हवेत पसरतो.

हा सुवास घर किंवा दुकानाच्या परिसरात माश्या, डास, कोळी आणि इतर विषारी कीटकांना आत येण्यापासून रोखतो. पूर्वी जंतुनाशक स्प्रे नव्हते, तेव्हा हे उत्तम किटकनाशकाचे काम करायचे

जुन्या काळी लोक जंगलातून प्रवास करायचे. जर एखाद्याला वाटेत साप किंवा विंचू चावला, तर त्याला मिरची खायला दिली जायची. जर मिरची तिखट लागली नाही, तर समजायचे की विषाचा शरीरावर परिणाम झाला आहे

तसेच रस्त्यात विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाकला जायचा कारण लिंबाचे आम्ल जंतू मारण्यास मदत करते.

काळाच्या ओघात विहिरीचे पाणी तपासणे किंवा कीटक पळवण्याच, विषाची परीक्षा हा व्यावहारिक उपाय मागे पडला. लोकांनी मूळ विज्ञाना ऐवजी धार्मिकतेला जास्त महत्त्व दिले, ज्यामुळे आजही ही प्रथा टिकून आहे.

वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोनातून 'अलक्ष्मी' नावाची कोणतीही शक्ती किंवा व्यक्ती प्रत्यक्षात येत नाही. हा केवळ माणसाच्या मनात 'नकारात्मक ऊर्जा' किंवा आजारपण घरात येऊ नये, यासाठी तयार केलेला एक प्रतीकात्मक समज आहे.